मऱ्या
त्याचं नाव तसं रमाकांत होतं. या नावाचं इतरांना मोठं कौतूक वाटायचं. तो तसं आवर्जुन सांगायचा, “माझं नाव रमाकांत हाई.” हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर सवर्णी उमंग दिसायचा. पण वस्त्यांवर त्याच्या नावाचा भलताच अपभ्रंष झाला होता. जसं, आधी रमाकांतचा रम्या झाला आणि नंतर मऱ्या. आता त्याला सगळे मऱ्या म्हणूनच ओळखतात. खरं तर आता त्याला रमाकांत म्हणून हाक मारली तर तो ‘ओ’ पण द्यायाला विसरलाय. पण मऱ्या म्हटलं की धडपडत “जी.” म्हणत समोर उभं राहायचा. त्याच्या त्या भलत्याच लगबगीत अदब आणि दीनवाणा भेकडपणाही असायचा.
“इतका का रे आदबीनं उभा राहतोस.” म्हणून त्याला विचारलं तर म्हणायचा, “कायये ना भाऊ. वाटतं उगीच कुणी आपल्यावर नाराज व्हया नगं. कशाला कुणाचं बालंट. व्हय. तसं मला पोलिसांचा कमी आणि आमच्याच माणसांचा ज्यादा तरास असतोय. नाय पण मला नाय कोण तरास देत.”
रमाकांतचा मऱ्या झालेला तो एक उमदा तरुण. उन्हा-पावसानं भलताच रापलेला चेहरा आणि करपलेला गोरा रंग. उभट चेहऱ्यावर बसलेले गालफाड, गरीबीतही सदैव चमकदार असलेले पिंगट डोळे, सदैव विस्कटलेले भुऱ्या रंगाचे विरळ केस कपाळावर रुळत असायचे. मरतुकडा मऱ्या भलताच काटक होता. जेमतेम पाच फुट उंचीचा मऱ्या परिस्थितीनी हाडकुळा झालेला. नाहीतर भरल्या अंगाचा आणि स्वच्छ राहणीमानाचा असता तर राजबिंडा दिसला असता.
“तू काम काय करतोस रे” विचारलं तर सांगायचा, “भाऊ चोरी आणि लबाडी सोडून सगळं कष्ट करतोय. प्वाट वाईट नसतं भाऊ.. ते भरायचे इचार वाईट असत्यात. खरं सांगू का, वंगाळ आन वाईट-वक्ट काम करुन बी प्वाट भरतंय आन् निवाळ कष्टानी बी प्वाट भरतंय. कष्टाला न्हाय म्हणायचं न्हाय. कष्टासाठी रात-दिन पळ पळ केली, की पोलसाडा पासून वाचाय पळ पळ करायची यळ यत न्हाय. आंग टाकलं की झोप लागतीया. शिट्टी वाजू, सायरन वाजू, काठी वाजू नायतं बुटाड वाजू. ऐकून छाताडात धडधड वाढत नाय. बिनघोर झोपता येतंय. त्यांच्या कचा कचा शिव्या न्हाय आन् गुरावानी बडवून घेनं न्हाय. का? त किती बी कष्ट असू द्या दमायचं नाय आन किती बी वाईट दिस आसूद्या कोनाचं कायबी चोरायचं नाय, आन् मागायचं नाय. घामाचंच खायचं.”
त्याच्या बोलण्यात किती सहज सुंदर साधे तत्त्वज्ञान होते. तो तसा जगतही होता. गुन्हेगारांना पोलीस हिस्ट्रीशिटर म्हणून ओळखतात. नजरेने हेरतात. त्यांची ख्याती सगळ्या ‘खाकी’ला माहीत असते. तसं मऱ्याच्या बाबतीत नव्हतं. पोलीसही त्याला कधी ‘नगाला नग’ म्हणून उचलत नव्हते किंवा उगाच कुठल्ल्या कुठं राग काढीत नव्हते. हा, पण त्यानं पोलिसांसाठी खबऱ्या व्हावं असं मात्र त्यांना वाटायचं. पण खबऱ्या होणं म्हणजे त्यांच्याच माणसांची दुश्मनी घेण्यासारखं. कधी पोलिसांनी काही खबर-बात विचारलीच तर म्हणायचा, “माय-बाप, जगतुया तर जुगद्या की सुखासुखी. तुमचं लई उपकार हायेत. एवढा आजून करा. मला... जातीत बोल लागू देऊ नका. न्हायतर, तुमी सॉडलंय. पण आमची माणसं जित्ता न्हाय ठॉयची. तुम्हाली बी म्हायतीया.”
पण नुसतं पोलीस त्याच्याकडं येऊन गेले तरी जातीत त्याच्याकडे संशयानं पहायचे. कवाबवा तोडून टाकायची भाषा करायचे. पण तो, “न्हाय लगा, न्हाय लगा, रेडकोबाची आन घेऊन सांगतुया. काय बी न्हाय बोलत मी पोलसाला.” अशी विनवणी करुन समजूत घालायचा. त्यांच्या दृष्टीने त्याचा भेकड स्वभाव म्हणजे मुखबिरी करण्याचं धाडस करणार नाही याची खात्रीच होता. त्याच्या कष्टाने जगण्याच्या सुखात एवढाच काय तो अडसर असायचा. कधी कधी त्रास व्हयाचा. त्याची माणसं पण, “आपलाच हाय, पण आपल्यातला न्हाय. कामातून गेलाय. हमाली करतुया.” म्हणून हेटाळणी करुन त्याला सोडून देत.
असा त्याचा सुखाचा संसार सुरु होता. होय संसार. त्याची जोडीदारीण पण त्याच्यासारखीच सुस्वभावी. मऱ्या सारख्याच रापलेल्या गोऱ्यापान गोल चेहऱ्यावर मोठाले घारे डोळे कधीच आक्रमक वाटले नाही. डोळ्यात खानदानी शालीनता कुठून आली होती कुणासठाऊक. सतत हसरा आणि बोलका चेहरा. बोलणं अत्यंत गोड, लाघवी आणि मर्यादा राखून. डोईवर पदर घेऊन कुरुळे केस दोन धडप्याच्या साडीच्या पदराखाली झाकले तरी दोन्ही बाजूंनी कपाळावर रुळत असायचे. कधी कधी ती पदर खोसून आणि तो डोक्याला गमछा बांधून समोर आली की हे दोघं दिवसभराचं उन डोक्यावर घेऊन काही तरी रानमेवा घेऊन आले असं समजायचं.
“भाऊSSsss, ताज मधय. ही बघ, पोळीच आणलीया. तुला सस्तात देतो की. न्हाय म्हणू नगं. घी की. आरंSSss... खात जा जिवाला, चांगला आसतुया मध.” असं म्हणून जवळच्या पातळ पंच्यात पोळं टाकून जवळच्याच थाळीत पिळून काढायची. मग काचेच्या बाटलीत भरून ठीव म्हणून सांगयची. पैसे दिले की कपाळाला लावून मधाबरोबरच मधाळ शब्दात दुवा पण फुकटात द्याची. बोहणी झाली म्हणून.
असंच जो हंगाम असंल ते विकायला आणायचं. कधी करवंद, कधी जांभळं, रान बोरं तर कधी कधी चक्क खायचा डींक पण घेऊन यायचे. जसं त्यांच्या कष्टात आणि कष्टाच्या जगण्यात कसलीच भेसळ नव्हती तसंच ते जे विकायला आणत त्याच्यात कसली भेसळ नाही की मापात पाप नाही. घसघशीत देणं आणि हाताला येईल ते घेणं असं त्यांचं जीणं सुरु असलं तरी एकंदरीत त्यांच्याकडे पाहून दोघं राजा-राणी या कष्टसाध्य जगण्यात सुखी वाटत होते. चोरी नाही, मारामारी नाही, कुठं राखायचं नाही की कुठं बळच दडपून पसा पसा मागायचं नाही. त्यांच्या जगण्यात स्वाभिमान होता.
पण सतत हसतमुखाने समोर येणाऱ्यांच्या झोपडीत, दारिद्र्याव्यतिरिक्तही एक कठोर परीक्षा घेणारं वास्तव आहे याची जाणीव बाहेरच्या जगाला असायचं कारणच नाही. जगात यांच्या असण्या नसण्याची दखलच घेतली जात नसते. भटक्या आणि दुर्लक्षीतांच्या घरातील दुःख कोण लक्षात घेणार?
पण दिवसभराचं कष्ट उरकून जंगला जवळच्या झोपडीत गेलं की बाहेरचं सारं कष्ट टाकून हे जोडपं त्यांच्या लेकरांच्या व्याधीनं पिळवटून जायचं. त्यांच्या लेकरांवर त्यांच्या देवाचा कोप झाला होता. ‘कोण्या जन्माच पाप फेडतोय देवा’ असं म्हणून दोघंही त्यांच्या देवाचं सर्वकाही करत होते. पण देवाची कृपा काही केल्या होत नव्हती.
दोन मुलं आणि एक मुलगी. अत्यंत देखणी लेकरं. पण त्यांना जग दिसत नव्हतं. दृष्टी अधू होता होता आता तर शेवटच्या मुलाची नजर पूर्ण गेली होती. त्यामुळं त्याला आपण कुठे जात आहोत हे दिसायचं आणि समजायचं नाही. रांगत रांगत फिरणारं लेकरू कधी जंगलात गायब व्हायचं तर कधी जवळच्या रस्त्यावर जायचं. त्याच्या सुरक्षेचं घोर दोघांना लागलं होतं.
पण घर नाही सोडावं तर खायचं काय. बांधून काम नाही. मिळेल ते काम शोधायला आणि पूर्ण करायला कधी कधी रात्र व्हायची. थोरली मुलगी शेंडेफळाला संभाळायची पण तिचीही नजर अधू झालेली. नजरेच्या टप्प्या बाहेर लहाना भाऊ गेला की ती पण कासावीस व्हायची. पण सांगायचं कुणाला. जवळ लोकवस्ती पण नव्हती. मधला भाऊ पण आता जागेवर बसून होता. रात्री उशीरा हे दोघे आले की बारक्याला शोधून आणायचं हे त्यांचं पहीलं काम. लेकरु जंगलात कुठं तरी भुकेने मलूल होऊन पडलेलं असायचं. पुरतं मातीत माखलेलं. नशीब कोल्ह्या-कुत्र्यांनी लांडग्यांनी आजून उचलून नेलं नव्हतं.
समस्या गंभीर झाल्यावर त्यांनी एक उपाय सुरु केला. जाण्यापुर्वी झोपडीचं दार लावून तर घ्यायचंच पण घरात तिघांना कोंडताना बारक्याचा पाय झोपडीतच खुंटीला बांधून ठेवायचा. दानापाणी हाताला येईल असं ठेवायचं. पण असं तरी किती दिवस चालणार. बारक्या आता इतका चिकडा झाला होता की वेड लागल्यागत हाताला येईल ते कचाकचा चावायचा. एक दोन वेळा तर त्यानं बहीणीच्या हातालाच चावा घेतला. तेंव्हा पासून बहीणही जवळ जायला घाबरायला लागली. आता हे हाताबाहेर जायाला लागलं होतं.
मग एक दिवस तो देवऋषाकडं गेला. त्यानं कोंबडं उतरुन टाकायला सांगातीलं. “मागच्या जन्माचा फेरा हाय. जंगलात मागं कुणीतरी मायलेकरु मारुन टाकलं होतं त्यांचा पण वाराय.” असं सांगून त्यांच्याकडून आठवड्याच्या कष्टाचे पैसे तर घेतलेच वर उतरुन टाकलेलं कोंबडं त्याचच. पण लेकरांना दृष्टी आलीच नाही. तो आता आघोरी बाबा कडं गेला. त्यानं सांगीतलं, “आरं लई मोठा कोप हाय. लेकरांचं डोळं परत ययाला इथं माह्या देव्हाऱ्यात एक बोकड काप. त्याचं दोन्ही डोळं काढ आणि इथंच देव्हाऱ्यात त्या डोळ्यांची पुजा कर. बघ मग तुझ्या लेकरांना कसं चाक दिसाया लागतंय.”
त्यानं तशीच पुजा केली. पण लेकरांना फरक नव्हता. मग मनाचा मोठा हिय्या करुन माणसांच्या जगात ते दोघे या तिघांना घेऊन तालुक्याच्या गावाबाहेर झालेल्या नव्या जिल्हा उप रुग्णालयात आले. केसपेपर कुठे असतो, मोठे डॉक्टर कोण असतात. त्यांच्याकडं कसं जायचं यातलं काहीच माहीत नाही. मग नुसतं दवाखान्यात बसून.
योगायोगाने संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात माझी त्यांची भेट झाली. मला बघून मऱ्या मोठा उमेदभरला चेहरा करुन धावतच समोर आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते, आता मला दिलासा मिळंल. मी विचारलं “अरे मऱ्या काय करतोस इथं.” तर तो म्हणआला, “ये ना भाऊ. हे बघ....” असं म्हणत त्यानी मला त्याची बायको तीन लेकरांना घेऊन जिथं बसली होती तथे नेलं. लेकरांची पार रया गेलेली. तिघं पण आईच्या पदराला आंधळ्यागत धरुन बसलेले. माणसाची एवढी जनावरा सारखी आवस्था होऊ शकते हे पाहून धक्काच बसला. मागास, वंचित, भटक्यांसाठी नेत्यांचे पोट तिडकीने बोलणे आणि हे कटू वास्तव यात किती तफावत होती.
मी विचारलं, “डॉक्टरला दाखवलं का. काय म्हणतात डॉक्टर....” तो म्हणाला, “भाऊ डॉक्टरनी हात बी नाय लावला. नुसतं बघून म्हणाला, लेकरांना मोतीबिंदू झालाय. इथं उपचार होणार नाही. जिल्ह्याला मोठ्या दवाखान्यात जावं लागल. लई खर्च होईल.”
मोठ्या दवाखान्यातल्या डॉक्टरांनी एवढा सल्ला दिल्यावर त्यांची जबाबदारी संपली होती. आता माझे काम सुरु झाले होते. त्याचा सगळा तपशील घेऊन दुसऱ्याच दिवशी याची बातमी केली. ती पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली आणि खळबळ उडाली. पण ती नुसतीच खळबळ होती. नेहमीसारखी चर्चा फार झाली पण उपचार सुरु झाला नव्हता. आठ दिवस गेले. मग मला जिल्ह्यातूनच फोन आला. बातमी वाचून जाणीव सेवा चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांनी दखल घेतली होती. लगेच तिकडे गाडी घेऊन येतोय. तुम्ही आम्हाला ते कुटुंब दाखवा. दुर्दैवाने मी नेमका त्याच दिवशा तालुक्याला नव्हतो. पण त्यांना पत्ता सांगीतला. सहकाऱ्यांसह ते गाडी घेऊन आले आणि मऱ्याची झोपडी शोधून काढली. मऱ्या व त्याची बायको लेकरांसह तिथंच होते. त्यांनी लगेच त्यांना त्यांच्या गाडीतून तपासायला नेलं. वेगवेगळ्या तपासण्या झाल्या. जमेची बाजू अशी की ऑपरेशनने तिन्ही लेकरांना दृष्टी परत येणार होती. तसाही उशीर झाल्याने मोठ्या दवाखान्यात जाणे गरजेचे होते. ट्रस्टींनी तातडीने निर्णय घेऊन त्यांना पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले. तिथे उच्च दर्जाचे उपचार मिळाले. ऑपरेशन यशस्वी झाले. तीनही लेकरांना पुन्हा दृष्टी आली आणि या नवराबायकोला देव पावल्याचा आनंद झाला.
ऑपरेशन आणि उपचारा नंतर त्यांना आवश्यक सूचना देऊन परत पाठवण्यात आलं. पण काम संपलं नव्हतं. मऱ्या त्याच रात्री उशिरा माझ्याकडं आला. घाबरलेल्या आवस्थेत म्हणाला, “भाऊ, पोरगी घरी आल्यापासून कायबाय बरळतीया. काय पण म्हणतीया. तिला काय तरी दिसतंय. भलतंच. भाऊ देवरुष्यानी सांगीतलं व्हतं, डॉक्टर कडं जाऊ नग. आपरेशान केलं म्हणून देव कोपला आसंल कारं. आता कसं करायचं. देवाला कसं शांत करायचंरं. भलतंच इपरित झालंय आपल्या कून. देवाचं फूल (कौल) घेऊन दवाखान्यात जाया पायजं व्हतंरं. लSSsssईsss चूक झाली.” तो तडा तडा तोंड झोडून घेऊ लागला.
मला माहीत होतं देवाचा कोप वगैरे काही नाही. पण मी विचारात पडलो की डोळ्याच्या ऑपरेशनने मुलीची मानसीकता कशी बिघडली असेल. आता हा नवीनच पेच होता. रात्रीचे ११ वाजलेले. काय करावं अशा विचारात असतानाच डॉक्टर मित्राचे नाव नजरे समोर आले.
अडचणीच्या वेळी ज्या मित्राची आठवण येते तो खरा मित्र असतो असं कुठं तरी ऐकलं वाचलं होते. मी फोन लावला. झोपेतून उठवलेल्या मित्राला मुलीची स्थिती सांगीतली आणि तुझ्या हॉस्पिटलमध्ये रात्री ठेव सकाळी नगरला पाठवू म्हणालो. तर भाषेत शुद्ध आणि राहण्यात शुचिर्भूत असलेल्या मित्राने अंग काढून घेतले. “नकोरे बाबा. त्यांचे ऑपरेशन पुण्यात झालंय. त्यांनाच विचार काय झालं असंल. माझ्याकडे नको. आधीच तुझ्या बातमीने तुझे पेशंट सेलेब्रिटी झालेत. माझ्याकडे काही झाले तर अडचण येईल.” एवढं म्हणून त्याने फोन कट केला.
या मानव सेवेत सहभाही होण्याची संधी त्याने गमावली. आता पेच आणखी वाढला. शेवटी अशा वेळी काय तर सरकारी दावाखाना. ते ऐकतील म्हणून गावातल्या सरकारी दवाखान्यात त्याला मुलीसह घेऊन गेलो. वैद्यकीय अधिकारी फार सुरस्वभावी होते. त्यांना हकीगत सांगीतली.
अगदी सहज, सोप्या शब्दात आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्यांनी सांगीतले.
“सर, काहीच काळजी करु नका. विशेष काही नाही. आज संध्याकळचं औषध डोळ्यात टाकलंय का? गोळ्या दिल्यात का?” नाही म्हलटल्यावर त्यांनी आणखी सहजतेने सांगीतलं. “हे बरंच झालं. आता औषधं दाखवा.” ते पाहून ते म्हणाले, “डोळ्यात टाकायच्या या औषधाने मुलीला असा त्रास होतोय. काहीच काळजी करु नका. ठीक होईल. औषध बदलू.” त्यांनी त्यांच्या एका नेत्रतज्ञ मित्राला फोन करुन सर्व किस्सा सांगीतला. त्याने तिकडून दुसरे औषध सुचवले आणि ते रात्रीच उपलब्ध करुन मऱ्याच्या हातात दिले. मऱ्या ने सगळं काही ऐकलं होतं. आता त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला होता. तो हसत हसत म्हणाला, “भाऊSSsss देवच पावला लका.”
मघाशी कोपलेला देव आता त्याला पावला होता. तो देव होता सरकारी दवाखान्यातील ते डॉक्टर. सामान्य माणसं डॉक्टरांना देव म्हणतात ते उगीच नाही. माणसंही संकटाच्या काळात भेटली की आपण म्हणतो, कसा देवासारखा धावून आलास. त्याच्या संकटात त्याला आधी जाणीव सेवा संस्थेचे अध्यक्ष देवा सारखे भेटले होते. डॉक्टरांना हात जोडून म्हणालो, “जिवाला घोर लागलं होतं बघा. डॉक्टर खरंच तुम्हीच देव आहात.” तर अत्यंत सहज सोप्या स्वभावाचे डॉक्टर म्हणाले, “आहो आपणच असतो एकमेकांचे देव. मानवी स्वभाव आणि संवेदना जिवंत असल्या की देव आपल्यात संचारतो. डॉक्टर देव नसतो. माणूसच देव असतो. हा एक मात्र नक्की की आमच्या सारख्यांना देवाने निवडलेलं असतं, रुग्ण सेवेसाठी.” त्यांच्या नम्रतेने भारावून गेलो. देवानेच डॉक्टरांच्या हातांना स्पर्श करुन पृथ्वीवर पाठवलेलं असतं. रुग्णांच्या वेदना थांबवण्यासाठी. परमेश्वर स्वतः येत नाही पण त्याच्या हाताच्या स्पर्शाने डॉक्टरांना पाठवतो.
तीनही लेकरांना आता चांगली दृष्टी आली होती. झोपडीसमोरच्या धुळीत ते एकमेकांच्या मागे धावत खेळत होते. मऱ्या आणि त्याची बायको नव्या उमेदीने उगवत्या सुर्याबरोबर कष्टाला बाहेर पडत होते आणि घरी आल्यावर खेळत्या लेकरांना बघून अंतर्बाह्य सुखावून जात होते.
रमाकांतची कथा एवढ्यावरच संपत नाही. पण त्याच्या जीवन व्यथेतून एक सुखाचे आणि समाधानाचे पान मात्र इथे शोभून दिसते.
- प्रा. भरत भि. वेदपाठक.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा