श्रीकृष्ण समजून घेताना
‘जया मनी जस भाव तया तस देव’ म्हणतात त्या प्रमाणे
श्रीकृष्णाला ज्याने ज्या नजरेने पाहिले त्या नजरेने श्रीकृष्णाने त्याला रुप
दाखविले. विविध साहित्यात तो कुठे साधा
मानवी रुपात दिसतो तर कुठे अलौकीक, सर्वशक्तिमान परमेश्वर होतो. या दरम्यान ग्रामीण साहित्यातील श्रीकृष्ण
म्हणजे लडिवाळ बालक आणि प्रगल्भ पण खट्याळ शृंगारीक असतो.
जगप्रसिद्ध
चार महाकाव्यात दोन भारतीय आहेत, हे आपले भूषण होय. इलियड व ओडीसी ही होमरची महाकाव्ये तर रामायण -
वाल्मिकी आणि महाभारात – व्यास ही भारतीय महाकाव्ये आहेत. रामायण जीवनाचा आदर्श सांगते. जीवन कसे आहे हे माहाभारत सांगते. आजही आपल्याला दैनंदिन जीवनात महाभारतातील एक
तरी व्यक्तीरेखा मिळते. मग ती दुःशासन, दुर्योधन,
कर्ण, अर्जुन किंवा श्रीकृष्ण यांच्या पैकी कोणतीही असेल.
श्रीकृष्ण
या व्यक्तीरेखेचे असंख्य पैलू आहेत. मात्र
या व्यक्तीरेखेचे वर्षानुवर्षे ज्याला जसे भावेल तसे सादरीकरण होत राहिले
आहे. त्यात प्रचंड कल्पनाविलास पुरेपूर
उतरला आहे. तर्क-वितर्कांचा समावेश, ईश्वरी
अवताराच्या धारणेतून व धर्मद्वेषाच्या चष्म्यातून परस्पर विरोधी असे चिकित्सारहीत पूर्वगृहदुषीत किंवा पूर्वगृहपोषीत
दृष्टिकोण श्रीकृष्णाबाबत सतत पसरत राहिले.
या सर्वांमुळे या व्यक्तीरेखेचे खरे स्वरुप समोर आलेच नाही.
याची
खडतर जन्मकथा, खट्याळ बालपण, गुरगृही शिक्षण, राज्यकारभार, याची मैत्री, मातृभक्ती, गुरुभक्ती,
भगीणी श्रद्धा, स्त्रियांशी वर्तणूक, सर्वकाही अलौकीक व विलक्षण आहे. याचे सारे जीवनच एक कठोर प्रवास आहे. ते सामान्यांच्या आकलन चौकटीतील नसल्याने ज्याने त्याने सोईने घेतले. श्रीकृष्णाचे आकलन आजही अभ्यासाचा व समाजासाठी उपुक्त मार्गदर्शनाचा विषय आहे. तसेच त्याचे राजकारण, युद्धनिती आणि समाजकारण
हे देखील आजच्या परिस्थितीत धोरणात्मक व मार्गदर्शक आहे.
लोकनाट्यातील
गवळणींना अडविणारा कान्हा आजही गणगवळणीमधून गवळणींच्या दहीहंड्या फोडतो. त्याची ही खोडी लडीवाळ वाटते तर आपलीही हंडी
फोडावी अशी या नाट्यातील प्रत्येक गवळणीला अपेक्षा वाटते. तरीही एक लाडीक तक्रार त्या करत राहतात. इथे पारंपारिक लोकनाट्यांना भावलेला कान्हा
लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘मै नहीं माखन खायो ते मैने ही माखन खायो’ अशा शब्दच्छलात
कान्हा आजही प्रत्येक आईला भावतो आहे.
प्रत्येकीलाच आपलं लेकरु त्या कान्ह्या सारखं एकदा तरी खट्याळ वाटलेलं
असतंच.
श्रीकृष्णाच्या
आयुष्यातील कोणतीही कृती, व्यक्ती आणि युक्ती व्यर्थ किंवा विनासंदेश नाही. त्याच्या प्रत्येक शब्दात संदर्भीत व्यवस्थेला
इशारा तरी आहे किंवा संदेश तरी आहे. बाललीलां बरोबरच त्या वयात केलेल्या शौऱ्याच्या
थक्क करुन टाकणाऱ्या कथा-घटना श्रीकृष्णाच्या अवतारी माणणाऱ्यांच्या समजुतीला बळ
देतात. इथे चमत्कार प्रधानता ही बाल
रुपापासूनच श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेला जोडली गेली आहे. ती प्रत्येक चमत्कृती-पसंत साहित्यात कायम
आहे. आपल्या आराध्याच्या सर्वशक्तिमान
असण्याची भाविकांची भावना व पक्की समजूत त्याला कायम बळ देत आली आहे. कारागृहात जन्म घेत या शक्तिमान महात्म्याचा
जीवन प्रवास सुरु होतो. आईला परके होऊनही
पोरकेपणा व्यक्त न होता बालपण सुरु होते.
वसूदेव-देवकी, नंद-यशोदा यांचे धैर्य, त्याग आणि कर्तव्यपरायणता या
बालकाच्या जन्मातील पायाभूत शक्तिरेखा आहेत. त्यागाची ही मालिका पुढे श्रीकृष्णाच्या आयुष्याचा एक भागच बनून गेली.
वयाच्या
अवघ्या सहाव्या महिन्यात या बालकाने पुतनेचा वध केला. एक वर्षांचा असताना तृणावर्ताचा वध केला. ३ वर्ष आणि चार महिन्यांचा असताना वत्सासुराचा
वध, चार वर्ष आणि चार महिन्यांच्या वयात अघासुराचा
वध करुन श्रीकृष्णाने आपल्या अलौकिक सामर्थ्याची झलक तत्कालीन व्यवस्थेला दिली
होती. तरीही उन्मत्त व्यवस्था या
बालकाच्या सामर्थ्याला पाखंड आणि भाकड कथा असल्याचे मानून आपले दुष्ट दमन चक्र
चालूच ठेवून होती. याच दरम्यान
धर्मार्थाने महत्व असलेले कालिया मर्दन श्रीकृष्णाने अवघे सहा वर्ष आणि नऊ
महिन्यांचा असताना केले होते. संकट किती
विक्राळ असो आणि कुठल्याही स्तितीत असो ते मी पायाखाली तुडवीन हा संदेश देणारी ही
सूचक कृती होती. वयाच्या १६ व्या वर्षी
श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. हा वध एका
कपटी, कारस्थानी व जनतेचा आदर गमावून बसलेल्या राजाच्या वध होता.
श्रीकृष्णाचे या पुढचे आयुष्यही सहज
सोपे नव्हते. परंतु प्रत्येक टप्प्यावरील
त्याचे जीवन आजही सर्वांसाठी मार्गदर्शक असेच आहे. महाभारताच्या युद्धात हातात शस्त्र न उचलण्याची
शपथ घेऊनही ती एकदा मोडणाऱ्या श्रीकृष्णाने युद्धनितीशास्त्राचा परिपाठ या दरम्यान
घालून दिला आहे. रणांगणावर अर्जुनाला
उपदेश करताना आपल्या शब्दसंमोहनाने आपल्या बौद्धीक प्रचंडतेचे विक्राळ रुप त्याने
दाखवून दिले.
गीतेचा तो उपदेश आजही जसाच्या तसा लागू
पडत आहे. त्यानुसार हींसा आणि अहिंसा
यांना आपापल्या मर्यादा असतात. जिथे
अहींसेची मर्यादा संपते तिथे हिंसा अनिवार्य होते. परंतु अशा स्थितीत अहींसेची जपमाळ ओढत
बसणारांवर हींसकांच्या शस्त्राला बळी पडून आपले अस्तित्व आपल्या कथित अहिंसात्मक वैचारिक
षंढतेने संपवून टाकण्याची बिकट स्थिती ओढावते.
युद्ध टाळण्याचे सर्व कूटनैतिक मार्गव अटोकाट प्रयत्न संपल्यावर युद्धाची
मानसीकताच न बाळगणारे संपून जातील हे निश्चित.
युद्ध अंतीम पर्याय असला तरी त्याची तयारीच न करणारे भेकड आणि षंढ या
वर्गवारीत इतिहास त्यांची नोंद घेईल.
आता प्राप्त
परिस्थितीत कोणी कृष्णावतार येईल आणि मग आपण मनव संवर्धन आणि संस्कृती जपणुकीची
तयारी करु असा समज असणारांसाठी खडतर काळ आलेला आहे. कृष्ण सर्वांचा व सर्व कृष्णाचे असे असले
तरी विचार भिन्नतेने ग्रासलेल्या समाजात मानवतेची जपवणूक करणे शक्य होत नसते. श्रीकृष्णाचे जीवनच तर दुष्ट निर्दालन आणि
मानवी संवर्धन असा संदेश देणारे होते. अशा
या श्रीकृष्णाच्या जीवनाची इतिकर्तव्यता शिकाऱ्याच्या बाणाने झाली तेंव्हाच त्याने
भविष्यातही मानवतेच्या पायाला जखम देत राहणारे शिकारी कायम असतील. सावध रहा असा इशारा दिलेला नाही काय मग आता कृष्णावताराची वाट न पाहता आपल्याच अंगी असलेल्या कृष्णावंशाला जागे करा. स्त्री अत्याचार हा कृष्णापमान आहे. आता भ्रष्ट व्यवस्थेबरोबर लढणे असो की अत्याराचा विरोध असो देशवासीयांच्या अंतरंगातील श्रीकृष्णाचा अंश जागृत असला पाहिजे.
भरत
वेदपाठक
मुक्त पत्रकार
एम.ए., बी.एड., एम.एम.आर., डि.सी.एम., हिंदी पं.
उन्मत व्यवस्था आणि तीचे पूजक यांचे दमन करण्यासाठी प्रत्येकाने कृष्ण रूप धारण करणे ही आजच्या काळाची गरज आपण या लेखातून अधोरेखित केली आहे . कृष्णाने विविधांगी भूमिका साकारत जीवन जगत असताना मानवाने आपले जीवन कशा पध्द्तीने व्यतित करावे हा सुंदर संदेश आपण आज या लेखातून श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दिला.त्याबद्दल धन्यवाद!
उत्तर द्याहटवा