माझी लीव्ह व्हॅकन्सी..
मुख्याध्यापकांनी गोड सरांशी परिचय करुन
दिला. गोडसर नावासारखेच गोड मृदुभाषी
सौम्य व्यवक्तीमत्व. मातृहृदयीच
म्हणाना. यांच्यावर माझी पुढील व्यवस्था
सोपवली. त्यांनी डबा आणलाय का विचारलं आणि
संध्याकाळी जेवणाला येण्याचं आमंत्रण दिलं.
“खोली पाहून हाताने करुन खा, तो पर्यंत
साठक सर डबा देतील.” असे सांगीतले. साठकसर, इथं नवीन येणारांना जेवणाचा डबा
स्वस्तात देत. संध्याकाळी गोड सरांकडे
जेवायला गेलो. सरांचा
परिवार सात्त्वीक. दोन मुली आणि एक मुलगा.
रात्रीचा मुक्काम प्रयोगशाळेतच
होता. असा प्रयोग करण्याची आयुष्यातील
पहिलीच वेळ. एकटाच होतो. टेबलावर गदी, गादीवर अंग टाकलं. सहज भिंतीवर नजर टाकली. शास्त्रज्ञांचे माहितीसह फोटो आणि तीन घड्याळं
होती. विद्यार्थ्यांनी भेट दिलेली. पैकी एकच चालू होतं. खाली वैज्ञानिक, जैविक, भौतिक माहिती देणारे
तक्ते होते. पायाकडच्या भिंतीवर लक्ष गेलं. तिथं मानवी शरीरसंस्थेच्या अंतर्गत रचनेची
माहिती देणारी रंगीत प्रतिकृती, दात आणि दाढ, मोठे आतडे, बुबुळाची रचना, मानवी
चेतासंस्था, नससंस्था वगैरे मॉडेल्स.
उजव्या बाजूला कपाटात रसायनं, चंचुपात्रं व इतर काचसामान. कपाटच्यावर कचरा टाकावा तसा पृथ्वीचा गोल आणि
नकाशे पडलेले. उगीचच मनात येऊन गेलं,
खरंचच आता पृथ्वी मानवी कचऱ्यात पडून आहे.
रात्रीचे ११ वाजलेले. तीन भिंती
पाहून झाल्या, चौथ्या बाजूला म्हणजे डोक्याकडच्या कपाटावर नजर गेली. बंदीस्त काचेत लटकवलेला मानवी हाडांचा सांगाडा माझ्याकडे
पाहून हसत होता. तो पाहताच गादीवर उठून
बसलो.
एक दीर्घ श्वास घेत सांगाड्यावरची नजर
हटवली, अंग टाकलं. तोंडावर पांघरुन घेऊन डोळे मिटले की मिटलेल्या डोळ्यांसमोर
सांगाडा लटकायला लागला. थोड्यावेळाने
प्रयोगशाळेत कुरकुरण्याचा आवाज येऊ लागला.
मग कोणीतरी भांड्यावर हळूच मारावे
तसा आवाज येऊ लागला. नंतर घुंगरासारखा
आवाज सुरु झाला. नंतर चीSSSss
चीSSSsss असा आवाज येऊ लागला. गादीवर पडल्या पडल्या फक्त डोळ्यापर्यंत
पांघरुन खाली ओढून न हलता नजर फिरवून पाहू लागलो.
बाजूच्या कपाटावरून एक भला मोठा ऊंदीर खाली पडला तसा माझा जीव भांड्यात पडला. पण तेवढ्यात धडाधडा दार वाजलं आणि माझा ठोका
चुकला. घाबरतच विचारलं, “कोणय”.
रात्रपाळीचा शिपाई होता.
तो आत आला, “काय
सर झोप येईल ना इथं?
कायबी काळजी करण्यासारखं नाय. बींधास
झोपा. प्रवासानं थकला असताल. माझी नाईट डूटीये मी सकाळी ईल.” मला बोलण्याची संधीच नाही. तरीही हातात लोटा धरल्याचा आकार करत मी त्याला
विचारलं. “सकाळी कुठे जायचं?” त्याने गोल डोळे करून पाठीमागे हात बांधून
मानेला झटका देत इशारा केला. “बिंधास
शाळेच्या मागं जा...होल वावर ईज आवरं.”
मी म्हणालो, “पण न्यायचं काय?” त्यानं एक प्लास्टीकचं मोठं चंचुपात्र कपाटातून
काढलं टेबलावर स्टाईलमधे आपटलं. एक हातानं
चंचूपात्र टेबलावर दाबत दुसऱ्या हाताचं बोट वरून तिरकं खाली करत म्हणाला, “याचा
प्रयोग करा. या प्रयोग शाळेतलं तुमच्या
पहिल्या प्रयोगाचं पहीलं साहीत्य.
सर्वत्र
समजलं, नवीन सर आलेत. दुसऱ्या दिवशी मला
पाहण्यासाठी प्रयोगशाळेच्या दाराशी मुला-मुलींचे घोळके येऊ लागले. प्रार्थनेच्या वेळीही लक्ष माझ्याकडंच. पण कालचे पाहुणे वाटणारे गृहस्थ प्रार्थनेच्या
वेळी हजर होते. त्यांनी मूल्य शिक्षणाचा तास
(त्रास) घेतला. पाचवीच्या पुस्तकातील,
नंदीबैल वाला गुबू गुबू वाजवत जोंधळे मागतो.
गावावर आफत नाय म्हणून सांगतो. हा उतारा दिला. शाळेने तो लिहून घेतला. पानं गोळा केली. तपासायला वर्गशिक्षकांकडे दिली. सातवीचे वर्गशिक्षक नसल्याने गट्ठा मला घ्यायला
लावला. तंतोतंत तपासून १० पैकी गुण
द्यायचे होते. तास संपल्यावर त्या
महानुभवांच नाव समजलं. फडजेबापू. शाळेचे सुपरवायझर आणि संस्थेचे लाईफ मेंबर. प्रसिद्ध खडूस. स्टाफरुम कडे जाताना शिक्षक कुजबुजत होते, “हे
काय गुबू-गुबू आणलंय मधेच?”
खरं तर मुलांच्या शुद्धलेखनाबरोबरच शिक्षकांनाही बापूंनी तपासणीचे वाढीव काम
लावून दिले होते.
जेवणाच्या सुट्टी पर्यंत सगळे तास
घ्यावे लागले. वर्ग रिकामा असेल तिथं
जायचं. एकदा शिपाई सांगायला आला, “पचवीचा
वर्ग रिकामाय. फडजे सरांनी वेदपाठक सरांना
जायला सांगीतलंय.”
तासावर गेलो. माझ्या पद्धतीनं
सुरवात केली. वर्ग खुलला. पण भिंती आडून ऐणारे फडजे सर फोक घेऊनच एकदम
पुढे आले. म्हणाले, “असं
असतं काय शिक्षण?” नंतर
पोरांकडं पाहून म्हणाले, “आजीबात गोंधळ नको. नाहीतर फोकाने फोडून काढीन. फडजे म्हणतात मला. आलं ध्यानात...”
हे अनपेक्षीत होतं. काहीच ध्यानात आलं नाही. पण मुलांच्या ध्यानात आलं. फडजेंची दहशत इतकी की पोरं तास सुटेपर्यंत
पुन्हा बोलली नाहीत की हलली नाहीत. प्रयत्न
करुनही वर्ग पुन्हा खुललाच नाही.
तास संपवून परत आलो तेंव्हा स्टाफरुम
मध्ये दोनच मॅडम होत्या. त्यांच्या
चेहऱ्यावर भाव होते, ‘आल्या आल्याच बिचाऱ्यावर कामाचा ताण
पडलाय...’ पैकी एका माडमची आणि माझी दुसऱ्या
तासाच्यावेळी धडक झाली असती. तास संपला
आणि मी झपकन बाहेर निघणार तेवढ्यात दारासमोर त्या आल्या. वय साधारण २५ गोरंगोमटं रुप. मध्यम बांधा.
त्रिकोणी नाक, बारीक चेहरा, चाफेकळ्यांसारखे डोळे. थोडे कुरळे केस. एकच वेणी. लाल साडी. मोहक रुप पण चिरका आवाज. मास्तरी पेशाला साजेसा.
दुसऱ्या तासाला धडक होताना पहिल्यांदा
वाचली. मधल्या सुट्टीत जिण्यातही तसंच
झालं. सहाव्या तासाला कळसच. स्टाफरुम मधे एकटाच होतो. याचं दार जिकडं भींत आहे त्याच्या विरुद्ध
बाजूला उघडतं. कोण कारागीर होता कोणासठाऊक? उठून खडूचे चिंचेच्या बुटका एवढाले तीन तुकडे घेतले.
दाराच्या मागून पुढे निघण्यासाठी
वळण घेतलं एवढ्यात ती तुफान मेल झपाझपा आली आणि एकदम मालगाडीच्या डब्यासमोर लाल
कार उभी रहावी तशी माझ्यासमोर करकचून ब्रेक लावत थांबली. काय बोलावं सुचलंच नाही. बाजूला झालो.
पुर्वी दोनदा धडक व्हावी असं वाटलं नव्हतं. पण तिरसऱ्यांदा धडक झाली नाही म्हणून भिताडालाच
धडक घ्यावी वाटली.... समोरुन येणाऱ्या एका वयस्कर शिक्षकांनी मला चालून आलेली ही
संधी पाहिली होती. तसा त्यांच्या
चेहऱ्यावर संधीचाच भाव होता आणि ते मंद स्मिती करत मान हलवत होते. चपापलो आणि निघालो. पुढे एक महिन्यांनी याच मॅडमनी त्यांच्या
विवाहाची पत्रिका माझ्या हातात दिली.
दरम्यान लक्षात आलं होतं, त्या खूप सात्त्वीक आणि हुशार होत्या.
सातवीचे वर्गशिक्षक चौधरी आले
होते. त्यांना ते गुबू गुबू चे कागद
द्यावेत म्हणून गेलो. मैदानात त्यांच्यासमोर
फडजेसर होते. मला पाहताच चौधरी सर
म्हणाले, “मी यांनाच हे तपासायला दिलंय. होतकरु आहेत.
उद्या नाही. रजेवर आहे. तेच तपासतील.” फडजेंनी
माझ्या खांद्यावर हात ठेवला, काम करण्याचा सल्ला देत म्हणाले, “इथली
शिस्त बिघडवू नका. तुम्ही कुठूनही आला
असाल. प्रॉम्ट आहात, दिसतंय तसं. पण तुम्हाला अजून फडजे म्हणजे काय माहीत
नाही. थोडेच दिवस आहात. पण माझ्या हाताखाली ट्रेंड व्हाल.” मी मान डोलवली. हातातल्या गुबू-गुबू कडं पाहीलं. डाव्या हाताचा अंगठा तर्जनीला चिकटवत हात हलवत ते
म्हणाले, “अगदी काना, मात्रा, उकार, वेलांटीसह
तपासा. मी तपासणारांच्या चुका काढणारंय.”
ऑफ तास म्हणून जेवणाचा डबा घेतला. साठक सर म्हणाले, “लवकर
घ्या ऊरकून.”
तेवढ्यात फडजेंचा निरोप आला, “एक वर्ग रिकामा आहे. जेवण नंतर करा.”
मी वर्गावर गेलो तेंव्हा फडजेसर हास्यकल्लोळात दोन शिपायांबरोबर मैदानावरच
जेवायला बसल्याचे मला वर्गातून दिसत होते.
माझाही डबा त्यांनीच घेतला होता.
एका वेळी २० रुपयंचा. तास संपवून
परत आलो. पहीलं तर २० रु. पैकी १५ रु. चा
त्यांनी खाल्ला होता.
बापू आठवड्यातून दोनदाच येऊन सगळ्या
सह्या करत. हे दोन दिवस सर्वांवर डाफरायचे
असत. विरोधी वातावरण निर्माण होऊ नये
म्हणून आक्रमण ही बचावाची पहिली पायरी.
लाईफ मेंबर म्हणून धाक होताच.
यांची उपक्रमशीलात दिसली नाही परंतु मूल्यशिक्षण आपणच आदर्शपद्धतीने घेतो
असा त्यांचाच दावा.
शाळा सुटल्यावर गावातून फेरफटका मारावं
म्हटलं. छोट्या गावाला कशाचंही मोठं कुतुहल असतं. गाव माझ्याकडं, ‘नवा सर. नवा सर’ म्हणून पाहू लागलं. एखादं पाचवी – सहावीतलं पोर पळत यायचं लाडं
लाडं हाताला शिवून परत पळून जायचं. सराला शिवल्याचा
आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसांडून वहायचा.
मला हे नवं होते. अवघडल्यासरखं
वाटत होतं. तालुक्याबाहेर, जिल्ह्याबाहेर
नवख्या शिक्षकाची भूमिका अवघडच असते.
त्यातून फस्ट अपॉंईंटमेंट, बी.एड्. स्केल लीव्ह व्हॅकन्सी. बहुतेक साऱ्यांना कुतूहल असावं, ‘कसा
घेतला असावाSSsss’.
खरंतर इथं लांबून आलेले टिकत नव्हते.
मोठी रजा टाकून पळ काढत होते. अशाच
एका रजा काळात मी ही भविष्याची स्वप्न रंगवत मोठ्या आशेनं इथं आलेलो.
जेमतेम
महिना झाला असेल हजर होऊन. शाळा सुटल्यावर
व्हारांड्याच्या पहिल्या पायरीवर शुन्यत नजर लावून बसलो होतो. दरम्यान वर्गांना कुलपं लावल्याचे तपासून जाधव
साहेब आणि मागे एक शिपाई येऊन माझ्याकडे पाहत थांबलेले माझ्या लक्षातही आलं नाही. शेवटी माझी तंद्री भंग करत साहेबांनी जवळ येत
खांद्यावर हात ठेवला. तसा मी उठून उभा
राहीलो. सर म्हणाले, “पैसे
संपलेत ना.” मी
मान डोलवली. “किती पाहिजेत. बोलतजा ओ.
आम्ही आहोत ना इथं.” माझ्या
डोळ्यात पटकन पाणी आलं. असा अनुभव प्रथमच
होता. सेवानिवृत्तीला अवघे काही महीने
राहिलेल्या मुख्याध्यापकांनी पालकांसारखा माझ्या डोक्यावरुन हात फिरवला. खिशात हात घातला आणि पैसे काढून माझ्या हातात
देत म्हणाले, “आम्हाला
उचल देण्याची तरतूद असते. माणसं ओळखता
येतात मला. तू तर माझ्या मुलासारखा
आहेस. एवढे बास की अजून देऊ. लागले तर सांग. उद्या व्हाऊचर करतो त्यावर सही कर. जमतं रे सगळं.
बोलत कसा नाहीस. काहीही अडचण असूदे
सांग. मी आहे ना.” सरांच्या एवढ्या बोलण्याने किती बळ
आलं म्हणून सांगू. अनुभवी नजर न बोलताही
कस नेमकं हेरते याची प्रचिती मला आली. सरांनीच
मला, “बाहेर राहू नकोस.” असे म्हणत शाळेतील अडगळीच्या
सामानाची खोली रिकामी करुन राहण्याची व्यवस्था केली होती. गोड सरांचा गोड मुलगा प्रसाद कधी कधी इथेच
गप्पा मारायला यायचा. विशेष म्हणजे त्यानेच
मला दाळतांदळाची खिचडी कशी करायची हे या खोलीत शिकवलं.
गावातील आठवडे बाजारात एक विचित्र गोष्ट
पहायला मिळाली. एक कोंबडी बाजार
असायचा. तिथे तीन दगडांच्या चुलीवर मोठ्या
पातेल्यात पाणी उकळत असायचं. त्यात जिवंत
कोंबडी बुडवून बाहेर काढायची आणि सोलून ग्राहकाला द्यायची. अशी पद्धत.
बागायतदारांच्या या गावात मात्र कोणताही शेतकरी
पडीक जमीन ठेवणार नाही याची काळजी सगळे मिळून घ्यायचे. जितके लागवडी खालील क्षेत्र जास्त तितके
व्यापारी बांधावर जास्त येत. ते परस्पर
बोली वाढवून बाग खरेदी करत. मी हजर झालो
त्या दिवशी रांगेत नव्या कोऱ्या सहा ओमनी गाड्या गावात आल्या होत्या. पण संपन्नतेने मुलींच्या शिक्षणाबाबत बेफिकीरी
आली होती. जेमतेम शिक्षण झाले की हात
पिवळे करण्याकडे कल होता. परिणामी
बाराखडी, जोडाक्षरे, एक-दोन हे पाचवीच्या वर्गाचे शत्रू होते. हा वर्ग विशेष कामासाठी जाधव सरांनी माझ्याकडे
सोपवला होता. त्यात विशेष प्रकल्प राबवून
मी सुधारणा घडवून आणली. ही माझी इथली एक
सक्सेस स्टोरी होती. खरं तर हा मुद्दा, ‘अक्षर
शत्रू वर्ग’ या नावाने स्वतंत्र कथेचा विषय होऊ
शकेल असा आहे.
नाईट ड्युटीचा शिपाई गुलाबराव भलताच
चालू माणूस. नुसत्या बड्या बड्या बाता करत
रहायचा. नुकतेच घेतलेल्या साडेसहा
हजाराच्या सोन्याच्या चेनमध्ये बोट अडकवून सगळ्यांशी बोलायचा. त्याचा हेतू सगळ्यांच्या लक्षात आलेला. पण कोणीच कौतूक करेना. याच्यापासून सगळे अंतर राखून असायचे. पिंगट बेरकी नजरेने नव्या मास्तरावर छाप
मारायची एक पण संधी सोडत नव्हता. फडजे सर
आणि मुख्याध्यापकांपुढे लाळघोटेपणा करत दात काढत बोलायचा.
शिक्षकांना तो आपल्या दावनीला (शाळेच्या खोल्या)
बांधलेले घंटीचे बैल म्हणायचा. बेल
वाजवल्याशिवाय बाहेर यायचं नाही, आतही जायचं नाही की घरीही जायचं नाही. सारे मास्तर कसे आमच्या इशाऱ्यावर चालतात. हे तो मला वारंवार ऐकवायचा. “जिंदगी अगर जहर है तो पीनाही पडेगा”
हे वाक्य सारखं चालू असायचं. याची पहिली
बायको याच्या स्वभावामुळे नांदत नव्हती.
दुसरीच्या शोधात होता. पण पहिलीचे
भाऊ दम देत होते. एकदा तर गावात येऊन याला
बेदम मारहाण करुन गेले होते. तरीही हा
दुसऱ्या दिवशी मोठं मैदान मारल्याच्या आविर्भावात सुजलेल्या चेहऱ्याने शाळेत
त्याचं पेटेंट वाक्य ऐकवत फिरत होता. खरं
तर इथला एक एक शिपाई एक एका स्वतंत्र कथेचं पात्र होते. या शाळेवर शिपायांचंच राज्य आहे असं त्यांनाच
वाटत होतं. बाकीचे नको उगीच पंगा म्हणून
त्यांना भाव देत होते. पण मेख वेगळीच
होती. ते फडजेंचे चमचे होते. ते आले की, शिपाई मागे-पुढे असत. शाळेची सगळी बित्तंबात, न घडलेल्या प्रसंगासह
फडजेंना समजायची. मग फडजे अंतर्ज्ञानीच्या
आविर्भावात स्टफ मिटींगमध्ये ‘मुद्याला’
धरून फडा फडा झापायचे.
वायकंडे हे एक असंच इब्लीस पात्र. पुर्वी तमाशात होता म्हणे. नावाप्रमाणेच शाळेत अनेक कंड्या पिकवण्यात
त्याचा हातखंडा. कितीही मळकी असली तरी
त्याच्या टोपीची धार जात नसायची. टक्कल
पडू लागलेल्या डोक्यात भलतीच विनोदी अक्कल होती.
सुट्टीच्या दिवशी रंगात आला की तमाशातल्या सोंगाड्या सारखा बाजी मारून
न्यायचा. तास कसा गेला हे समजतही
नसायचं. हा मामा तसा लहरी पण मनमिळाऊ
होता. त्यानं नवी एम-८० घेतली होती. तिची पार्टी होती. मला म्हणाला,
“तुम्हाला यायचं असंल
तर चला. माहीच पार्टीये. पण कह्याला येता. व्हय.
मी तर महंताला पण कटावलंय ( हा एक युवा नवा शिपाई). नाय तुम्हाला यायचं असलं तर चला, बघा. पण जाण्याआधी सांगाय आलो की आम्ही
चाल्लोय. तुम्ही तुमचं उरका. आम्ही जाऊन येतो. आन् पार्टी बी तसलीचंय (हाताचा ठेंगा तोंडाकडे
घेत). तुम्हाला जमतंय नाय जमतंय. व्हय... कनाय.... आँ...”
वायकंडेची नाईट ड्युटी असली की रोज रात्री
प्रयोगशाळेत त्याचा एकपात्री प्रयोग रंगायचा. मी त्याचा एकमेव रसीक प्रेक्षक. खरंतर
शिपायाच्या नोकरीत त्याचा जीव घुसमटत असावा.
म्हणून तो संध्याकाळी सोंगाड्या झाला की भलताच खुलायचा. त्याची स्मरणशक्ती, विनोदबुद्धी, आवाजातील अरोह-अवरोह, मुद्राभिनय, देहबोली
पाहून मी चकीत व्हायचो. तो रंगमंचावरच
वावरत असल्याच्या आविर्भावात तल्लीन होऊन जायचा.
याने जर वर्गात कविता शिकविल्या तर मुलांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील असं
मला वाटायचं. पुर्वी कधीही ऐकली नव्हती
अशी गाणी तो ऐकवायचा. ती स्वरचित असल्याचा
त्याचा दावा होता. त्यातलं त्याचं एक
आवडतं गाणं रोज नव्या अभिनयासह ऐकवयाचा. “चल
आमच्या देशाला उपटायला धसकटं.”
जवानी संपली,
रक्त संपलं
जाशील मग तू
कुठं ?
चल आमच्या
देशाला ,
उपटायला
धसकटं ।।
पान खान्याची
तह्रा.
जनुकाय डबडं
रंगावलं.
रं बाबा
रंगावलं....
हे डबीभर
काजळ
जनुकाय
गाडीला
वंगावलं .
बाबा
वंगावलं.
खड्डा
आल्यावर
या गाडीच्या
होतील धुऱ्या
वर नीटं.
चल आमच्या
देशाला,
उपटायला
धसकटं.
कैक
डायवर-किन्नरनी,
भज्याच्या
थाळीवर,
फसावलं
तुला हिनावलं.
बाबा हिनावलं.
कैक येड्या
गबाळ्यांनी
तुला
बनावलं..
रं बाबा
बनावलं.
तुला
घुमावलं.
रं बाबा
घुमावलं.
वास
सुटल्यावर
या आंगाचा
नाही थांबणार
कुणी इथं...
चल आमच्या
देशाला
उपटायला
धसकटं...
डोक्यावरची टोपी काढून टक्कल पडलेलं डोकं
हालवीत देवीच्या वनांनी भरलेला गोल चेहरा
गाणं म्हणताना भलताच बोलका दिसायचा. छोटे
डोळे गाण्याच्या ठेक्यानुसार बारीक मोठे करत मिचकावत तो गाण्यातील रसनिष्पत्तीच्या
जागा बरोबर दाखवायचा. मध्येच वरच्या
दातांनी खालचे ओठ दाबून धरीत चेहऱ्यावर गूढ मदहोशता आणित मान डोलवायचा. जोडीला शाळेतील कळशी ठेक्यात वाजवायचा.
कधी कधी गाण्यात यमक जुळायचं नाही. पण अर्थ मात्र रसभरितपणे प्रकट व्हायचा. ते तर त्याचं वायतत्त्व होतं. दरम्यान येथेच शिक्षक म्हणून वाटचालीचं यमक छान
जुळलं आणि माझी लीव्ह व्हॅकन्सी संपली ती कायमचीच.
(ही एक काल्पनीक कथा असून यातील सर्व
पात्र देखील काल्पनिकच आहेत. याचा
कोणत्याही प्रत्यक्ष घटना किंवा प्रसंगाशी कोणताही संबंध नाही.)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा