आकर्षण


             नुकतेच नव्या गावात नव्या खोलीवर आलो होतो.  पहिल्याच दिवशीच्या रात्री विलक्षण स्वप्नाने भुरळ पाडली आणि विलक्षण आंतरिक ओढीने कासावीस झालो.  अनेक स्वप्ने पाहिली, परंतु या स्वप्नाने वेगळीच चुटपूट लागली.  स्वप्नात पाहिलेल्या विलोभनिय, सुंदर व नाजूक आकृतीने मोहिनी घातली.  स्वप्नात आलेली ती अपेक्षा नसताना वेडावून गेली.  माझ्या खोली समोरच्या मोठ्या पटांगणातील पायांना सरावलेल्या वाटेवरुन तिच्या आकर्षक लयीन ती चालत गेली, मानवेळावत.  त्या चालीने तिचे उडणारे बॉबकट केस जणू खुणावतायंत, निसर्गाने, सवडीने आणि सर्व सौंदर्याने बनविलेली, वेली सारखी नाजूक असलेली ही काया तुझ्याच साठीच आहे.

            ती गेली तशीच आली आणि आमची नजरा-नजर झाली.  तशी ती कावरी-बावरी झाली.  क्षणभर दोघांच्या नजरा स्थिरावल्या, अगदी क्षणभरच.  काजवा चमकून जावा तशा.  शहारल्या अंगाने लाजून तिने लाजाळूच्या पानाला स्पर्श केल्या प्रमाणे पापण्यां खाली घेतल्या आणि ओळखीच्याच वाटेवर नवख्यागत निघून गेली.

            एवढंच स्वप्न पाहिलं आणि मनाची वेडी धाव त्या स्वप्नातील तिला आठवू लागली.  मग रोज तोच अनुभव.  इथपर्यंतच ओळख मर्यादित राहिली.  अनुभव मात्र बदलत होते.  कधी ती पापण्या खाली पाडून एक कोमल हास्य साकारुन जायची आणि वाटायचं असंख्य गुलाब पुष्पांच्या पाकळ्या अवती-भोवती उधळल्या जातायंत.  कधी ती हलकेच वरच्या दातानं खालचा ओठ दाबायची आणि क्षणभर घुटमळून चालायला लागायची.  मी पक्के जाणले की दोघांच्याही मनात एकमेकांच्या अपेक्षेची ज्योत लवलवतेय.  परंतु धाडस होत नव्हतं....

असेच काही दिवस गेले.  चित्त ताळ्यावर नव्हतं.  प्राध्यापक बोलतात ते कानावर पडत होतं पण मनावर उतरत नव्हतं.  वर्गातही तेच तिचे विशिष्ट पद्धतीने हसताना आणि ओठ दाबतानाचे आभास.  पुढच्याच बाकावर बसून मी तिच्या विचारात गुरफटलेला असायचो.  मनाशीच हसायचो आणि आजुबाजूच्या वातावरणाची जाणीव झाली की खजील व्हायचो. 

मानःशास्त्राचे प्राध्यापक म.न.कवडे यांनी माझी मनस्थिती ओळखली.  त्यांनी एक दिवस मला बोलवून घेतलं आणि सांगीतलं, कुमार मी जाणतो की हे वयच असं असतं.  पण लक्षात घे या वयात असणारी ही गोष्ट म्हणजे वाढत्या वयाबरोबर भिन्न लिंगी व्यक्ती बद्दल असणारं एक अल्लड आकर्षण असतं.  ते खरं प्रेम नसतं आणि या वयात खऱ्या जीवनसाथीची निवड करता येण्याइतकी मानसीक कुवत नसते......

            एवढं बोलून पोक्त वयाचे, केसांची चांदी झालेले आणि नाकावर जाड भिंगाचा चष्मा असणारे प्रा.म.न.कवडे यांनी चेहऱ्यावर अफाट पसरलेल्या समुद्राची विशालता ओढत, संभ्रमीत प्रश्नार्थक मुद्रेने एक दीर्घ श्वास घेऊन माझा खांदा थोपटला.  थोर विद्वानासारख्या नेहमीच्या गंभीर चालीने, कसल्याशा पुस्तकाची गोल नळी करुन, पाठिमागे हातावर हात टाकून ते चालू लागले.  मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहीलो.  त्यांनी दिलेला अनुभवाचा डोस माझ्या अननुभवी नवतरुण मनाला पटला नाही.  त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीवर माझ्या विचारांची वलये पाहत होतो.  पण ती माझ्याकडे पाहून तोंडावर हात ठेवून मोती लवपीत खळखळून हसत माझ्या मागे काही अंतरावर उभी होती.  एका हातत नयनबाण हे पुस्तक घेऊन मला घायाळ करत.  सरांनी मला पाजलेलं ज्ञानामृत तिनं चोरून ऐकलं होतं.  तिच्या या कृतीनं मी पुरता थंडावलो.  मनाशी ठरवूनही तिला तो प्रश्न विचारण्याचं धाडस जमवू शकलो नाही.  ऐन वेळी छातीची धडधड वाढली आणि सर्वकाही आठवत असून विसरुन गेलो. 

            नकळतपणे टाइपींग क्लासकडे वळालो. मशीनच्या पेपर रोलवर पेपर लावला.  त्याकडे पाहत बसलो.  विचारांच्या श्रृंखला जुळवीत. तिच्याशी बोलण्याचं धाडस जमवीत.  टाइपींग न करता उठलो, खोलीवर आलो आणि तिला देण्यासाठी चिट्ठी लिहीण्यास सुरुवात केली. 

प्रिये,

तुझ्या नावाची सांजवात,

कधीच पेटलीय माझ्या मनात.

सांगावंस वाटलं तुझ्या कानात

पण, तू आहेस रुपाच्या गर्वात

प्रेमाचा सागर तुडूंब भरलाय नयनात

त्यातील काही ओंझळी

वाटलं टाकाव्या तुझ्या मनात.

            मनिषा मी जाणतो की, हे पत्र पाहून काही काळ विचारात पडशील किंवा रागाने बेभान होशील.  तरीही लिहीत आहे.  जेंव्हा पासून तुला पाहीलं तेंव्हा पासूनच नकळतपणे माझे मन तुझ्याच स्मृती चित्रामागे धावू लागलेय.  कुठल्याही स्वप्नात तुझ्याच प्रतिमेस शोधू लागतो.  तूच सांग मनाच्या अशा अवस्थेत स्वप्नावर किती दिवस रहायचं.  आयुष्याच्या या ठरावीक वळणावर तुझ्यासाठीच का थांबलो, मलाही समजत नाही.

            वयाच्या या ठराविक सीमेवर प्रत्येक हृदयाची मनज्योत अशीच अपेक्षेच्या झुळकेवर फडफडत असते.  प्रत्येकालाच वाटतं आपलं कोणीतरी असावं.  कोणीतरी आपल्यासाठी थांबावं.  आपल्यावर जीवापाड प्रेम करावं.  आपली अपेक्षा करावी.  तुला नाही वाटत, मी तुझी अपेक्षा केली ती यासाठीच की माझ्या निरागस व गंधहीन जीवनास तू तुझ्या कोमल मनपुष्पांनी सुगंधीत करावंस आणि तुला तुझ्या आयुष्यातून जाणाऱ्या सुवर्णक्षणांची जाण व्हावी.  माझ्या अपेक्षेत मला या विचारात काहीही गैर वाटत नाही.  कारण मी माझ्या अपेक्षांची आणि माझ्या विचारांची तुझ्यावर सक्ती करणार नाही.  यात तुला काही गैर वाटत असेल तर मनात संकोच आणू नकोस.  मी तुझी संपूर्ण साथ देण्यास तयार आहे.  तू तुझा निर्णय घेण्यास समर्थ आहेस.  माझ्या या प्रेम-प्रस्तावाचा शांतपणे विचार करुन निर्णय घे.  तुझा तुला योग्य वाटणारा निर्णय मला मान्य होईल.  परंतु का कुणास ठावूक मला असं वाटतं की तू माझा अपेक्षाभंग करणार नाहीस.

            मनिषा तुला असं नाही वाटत की रोज-रोज तेच कंटाळवाणं जीवन जगण्यापेक्षा आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त व्हावा.  कुणाचंतरी रोमांचकारी आगमन आयुष्यत व्हावं.  हे सर्व तुला अयोग्यही वटेल, कदाचित.  परंतु जगण्यासाठी एका नाजूक स्पर्शाची गरज असते.  दोन शरीरे जुळविणारी मन ही सर्वात जवळची वाट असते.  ज्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाहीलं त्या एकाच नेत्र कटाक्षात मी आपल्या प्रेमाच्या मूक भाषेचे पहीले पान वाचले होते.  मनिषा तुला दडविता येणार नाही की तुझ्या डोळ्यात जरी करारीपणाची चमक असली तरी यौवनाची नशा आणि अव्यक्त उत्कट प्रेम यांचा सुरेख संगमही झालाय. 

            तरीही तुझा नकार असल्यास माफीची अपेक्षा.  तुझा मधूर सहवास देवून जर माझे स्वप्नमोनोरे सुशोभीत करु शकली नाहीस तर निदान नाराजीच्या तीव्र आघाताने त्यांना तडा तरी जावू देऊ नकोस.                                            

                                                                                     तुझा,                                                                                                                       कुमार.

            असं पहीलंच मोठं पत्र लिहील्यावर ते द्यायचं कसं असा प्रश्न उभा राहिला.  त्यात बरेच दिवस गेले.  दरम्यान चिट्ठी खिशात ठेवून ठेवून घडीवर फाटून जात होती आणि मी ती पुन्हा पुन्हा लिहीत होतो.  एक दिवस पोर्च मधे कॉलेज चालू असताना मी फिरत होतो.  ग्रंथालयासमोरून जाताना ती अचानक ग्रंथालयातून समोर आली.  आली तशी गोड हसली.  पक्का निश्चय करुन फिरणारा मी चिट्ठी जवळ बाळगूनच होतो.  ती हसली तशी ही वेळ साधून चिट्ठी देण्याचा विचार मनात चमकून गेला.  तोच मजकूर असणाऱ्या चिट्ठीची ही किमना पाचवी तरी आवृत्ती असावी.  तिच्या हातात असणाऱ्या पुस्तकाकडे लक्ष गेलं आणि धाडस करुन मी विचारलं, कोणतं पुस्तक आहे”?  तिचे नाजूक ओठ क्षणभर उघडले आणि चांदीच्या असंख्य घंट्या किणकिणाव्यात तसे हलकेच मधूर शब्द वातावरणात उमटले, पहिली पायरी.  किलकिले डोळे आणि मंद स्मित करत तिने पुस्तक पुढे केले.  सर्वकाही पूर्वनियोजित असल्यासारखे घडत होते.  मी ते पुस्तक घेतलं.  उगीचच चाळल्यासारखं केलं आणि चिट्ठी तिच्या देखत पुस्तकात टाकली.  थरथरत्या हाताने ते परत दिलं.  माझी अवस्था आयुष्यत प्रथमच हजारोंच्या सभेसमोर भाषण करायला उभा राहिलेल्या वक्त्यासारखी झाली. 

            तिनं फक्त एकदाच माझ्या डोळ्यात पाहीलं आणि वरच्या दातानं खालचा ओठ चावत कावरी-बावरी होऊन आजूबाजूला पाहीलं.  धांदरट नजरेनं तिनं काय पाहीलं हे तिलाही समजलं नसावं.  तशी ती खांद्यावरची अबोली रंगाची ओढणी सावरत झरझर पोर्चच्या पायऱ्या उतरली.  थेट गेट मधे थोडीशी रेंगाळली.  आसपास कोणीही नव्हते.  संधी साधून तिने पुस्तक उघडलं.  चिट्ठी कडे पाहीलं आणि ते पटकन मिटून छातीशी धरलं.  माझ्या गालावरून मोरपीस फिरल्यासारखं रोमांच उभं राहीलं.  बावरलेल्या हरीणीसारखी पावलं टाकत ती दिसेनाशी झाली.  एवढावेळ पोर्चच्या खांबाला टेकून उभा होतो.  आता पोर्चच्या पहिल्या पायरीवर येऊन बसलो.  स्वतःला सावरण्याचा आणि काळजाच्या ठोक्यावर नियंत्रणचा प्रयत्न करीत. 

            त्या रात्री विचारांनी आणि शंका-कुशंकांनी डोक्यात वादळ उठलं.  दुसऱ्या दिवशी कॉलेजात न जाण्याचा निर्णय केला आणि खोलीच्या दारात बसलो.  तिच्या जाण्याची वाट पाहत.  पण ती ही आज जाताना दिसली नाही.  मात्र तिने तिच्या छोट्या मैत्रीणीकरवी ते, पहिली पायरी पुस्तक पाठवून दिलं.  मी आज गेलो नाही हे तिला कसं समजलं हे मात्र मला समजल नाही.  तिने पाठवलेलं पुस्तक मी घेतलं.  त्यात तिने माझ्या चिट्ठीचं उत्तर अवघ्या दोन ओळीत लिहीलं होतं. -

                        कुमार तुझ्या बरोबर मी ही पहिली पायरी चढण्यास तयार आहे.  आपण एकमेकांच्या साथीनं पुढच्या पायऱ्या चढू.

            माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता, मी मीच आहे हे जाणवत नव्हते.  तिच्या उत्तरानं मी पिंजलेल्या कापसासारखा तरंगत होतो.  आनंदाचे तरंग उठत होते.  वाटत होतं, वाऱ्याबरोबर पळत सुटावं.  एकांतात जावं आणि मोठ्यानं मनिSSSSषा मनिSSSSषा ओरडत सुटावं.  खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या मधूर लयीबरोबर मंत्रमुग्ध होऊन तिच्या बाहूपाशात एकांतात स्वतःला विसरुन जावं. 

            त्याच दिवशी संध्याकाळी भेटण्याचा निरोप मी तिला दिला.  दोघेही अगदी ठरल्या वेळेच्या आगोदर बागेत आलो.  ती आमची पहिलीच भेट होती.  आजही आठवतं, तीने पीवळ्या रंगाच्या साडीवर मॅंचीग केले होते.  आम्ही बागेत एका कोपऱ्यात गुलमोहराच्या झाडाखाली बसलो.  फुललेल्या गुलमोहराला बहरलेल्या जाई-जुईच्या वेलींनी वेढलं होतं.  हिरवळीने आमच्यासाठी मखमलीचे गालीचे अंथरले होते.  पक्षी फांद्या-फांद्यांवरून सुरात सूर मिसळून प्रेमगप्पा मारत होते.  फुलपाखरं फुलांचा रंग घेवून वातावरण स्वर्गमय बनवत होते.  हातात हात गुंफून आम्ही कितीतरी वेळ बसून होतो.  मी अधीक काहीच बोललो नव्हतो पण ती मात्र आजूबाजूच्या झाडीतून अखंडपणे चिवचिवणाऱ्या चिमण्यांसारखी, पहिल्याच भेटीत लांबवर पसरलेल्या, अनेक फाटे फुटलेल्या, सुखाच्या फुलांनी, दुःखाच्या काट्यांनी आणि जीवनात येणाऱ्या निराशेच्या फुफाट्याने भरलेल्या वाटा बरोबरच तुडविण्याचं स्वप्न पाहत होती.  ती खूप बोलकी होती.  सतत बोलतच होती.  बांध तोडून वाहणाऱ्या पाण्यासारखे तिचे शब्द वाहतच होते.  मी मात्र तिच्या बोलक्या स्वभावात आणि सौंदर्याच्या सागरता बुडालो होतो.  पहिल्याच भेटीत ती इतकी बोलत होती जणूकाही आमची पूर्वजन्मीची ओळख होती. 

            हळू हळू भेटीगाठी वाढत गेल्या.  तिला सतत बोलत राहण्याची सवय म्हणण्यापेक्षा आवड होती.  तसा मी गंभीर होतो.  मनातल्या मनात भविष्याचा वेध घेत.  तिची चित्रकलाही खूप छान होती, तसेच ती खूप छान कविताही करायची.  निबंध आणि वक्तृत्त्व स्पर्धेतही ती आघाडीवर असायची.  एव्हाना तिच्या कवितांना बहर आला होता.  म्हणून मी आवडीने तिचे नाव कविता ठेवले. 

            दिवसेंदिवस आम्ही अधिकाधिक जवळ येत गेलो.  इतके, की माझ्या उजव्या डोळ्यात कसलासा अस्पष्ट व्रण आहे आणि हनुवटीवर लहानपणीच्या जखमेची खून आहे हे तिला माहीत झाले.  तिच्या मानेवर तीन तीळ आहेत हे मला माहीत झाले.  आता लाजेची आडकाठी, अनुनय, संकोच या भावना नाहीशा झाल्या होत्या.  आम्ही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत होतो.  तिचं संभाषण कौशल्य प्रेमातही उठावदार होतं.  अनेकवेळा बोलता बोलता ती मला शब्दात पकडायची आणि मी गांगरुन जायचो.  तशी ती मनापासून खळखळून हसायची आणि माझ्या गळ्यात हात टाकायची.  मी निरुत्तर प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहत रहायचो.  तिच्या हास्यात आणि चेहऱ्यावर तिने मला जिलंकल्याचा भाव असायचा.

            एक दिवस तिला फिक्कट गुलाबी रंगाची साडी घेऊन दिली व ती नेसून संध्याकाळी खोलीवर बोलविले.  ठरल्याप्रमाणे ती आली तसा रातराणीचा मंद सुगंध खोलीचे वातावरण धूंद करु लागला.  तिच्या हातावर काढलेल्या पानाफुलांच्या मेंदीची थरथर वाढली.  सर्व शरीरावर रोमांच उभे करणारा विलक्षण नाद घुमू लागला.  इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी कमानीने आमच्या भोवती फेर धरला.  रंगा-गंधाची धुंदी आमच्या शरीरात भिनली.  आसपासच्या वातावरणाचे अस्तित्त्व इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात विरुन गेले.  ज्याच्या बहाण्याने ती घरुन निघाली होती ती अभ्यासाची पुस्तके मिटून बाजूला पडली होती.  मूक भावनांचा अथांग सागर बावरलेल्या नजरेत साठवून मनिषा फिक्कट गुलाबी रंगावर कोजागीरीचे नितळस्वच्छ चांदणे असणारी साडी नेसून माझ्या समोर उभी होती.  अनायास माझे बाहू पसरले.  आम्ही बागेत ज्या बाकावर बसत असू त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या फुललेल्या गुलमोहराला बहरलेली जुई जशी बिलगली होती तशी ती मला बिलगली.  मी अगोदरच तिला साडीची पसंती विचारली होती.  आता पसंतीची पोच सर्वांगावर उमटत होती. 

            त्या रात्री ती माझ्या खोलीतच होती.  आलींगणांची आवर्तनावर आवर्तने झाली होती.  पिंजलेल्या कापसातून बाजूला पडलेल्या सरकी सारखी दोन शरीरे वारंवार निपचित पडली होती.  हलक्या झालेल्या कापसाप्रमाणे सुखांच्या लाटांवर तरंगत होती.  वेळेचे भान आणि त्याची तमा नव्हती.  बाहेर पौर्णीमेचा चंद्र पूर्वेच्या गोळ्यासाठी ताटकळत होता.  इकडे गुलमोहरास बिलगलेली जुई पीळ सोडण्यास तयार नव्हती.  आम्ही नजरेनंच बोलत होतो.  फक्त पसंतीचे हुंकार तेवढे घशातून घसरत होते.

            घड्याळाचा काटा क्षणा-क्षणाने वेळ मागे टाकून धावत गेल्यासारखा त्या रात्री जरा लवकरच पहाटेच्या अभ्यासाच्या वेळेवर पोचला व गजराने कर्कश आरोळी ठोकली.  तेंव्हा वृद्ध रात्र विसाव्याच्या वाटेवर होती.  सुर्याची किरणे वठलेल्या रात्रीच्या बुंध्याशी घाव घालत होती.  तशी रात्र कलत चालली होती.  इकडे मात्र वृक्षाशी वेल एकरुप झाली होती ती पीळ सोडण्यास तयार नव्हती.   

            रात्र सरली.  जाताना मनिषा एक नजर अनाहूतपणे बहाल करुन गेली.  तिच्या त्या नजरेनं काय सांगीतलं हे मी समजू शकलो नाही.  चोर पावलाने गेलेल्या रात्रीच्या मागोमाग मनिषा निघून गेली.  तेंव्हा रात्रीच्या अंधाराला घडलेल्या घटनासहीत खाली ढकलून सूर्य एका नव्या दिवसासाठी वर येत होता......

            आज अचानकपणे हे सर्व आठवत होते.  कारण बऱ्याच वर्षानंतर अनपेक्षीतपणे तिचे पत्र आले होते.  माझ्या मनाला घुसमटून टाकणारे.  त्या परमोच्च सुखाच्या क्षणातील आठवणींनी काळीज पिळवटणारे.  कारण मीच मनिषाला नंतर झीडकारलं होतं.  त्या रात्रीच्या त्या क्षणानंतर हळूहळू मनिषाबद्दल माझे आकर्षण कमी झाले.  एका वेगळ्याच मुलीचं आकर्षण वाटू लागलं.  ती मनिषा पेक्षा सुंदर वाटू लागली.  हळू हळू मनिषाच्या अस्तित्त्वाची जाणीव मला होईनाशी झाली.  तिची जागा त्या दुसरीने घेतली होती.

            आज या सर्व आठवणींना मनिषाच्या पत्रांनं उजाळा दिला.  पत्रात ती म्हणत होती-

            प्रिय कुमार,

                        मी आज संसारात सुखी आहे.  तुझ्या प्रेमात फाटलेल्या मनाला जोडण्यासाठी जुनेर दिलाय तिह्राइताच्या संसाराच्या लक्तराचा.  कुमार त्या वेळी मला हवं होतं प्रेम आणि आधार, जे मला माझ्या घरात माझ्या सावत्र आई कडून मिळत नव्हतं.  म्हणून मी तुझ्या प्रेमात पडले.  हवा होता म्हणून तुलाच आधार समजले.  पण तुझ्या या प्रेमातून एक गोष्ट मी शिकले, ती म्हणजे हवा असतो त्यावेळी मिळाला नाही म्हणजे ज्यात नसतो त्यात आधार दिसू लागतो.  ज्यात नसतो त्या गोष्टी क्षणीक आधार देतात परंतु घेणाऱ्याचं आयुष्य कायमचं निराधार करुन जातात.  सावरता आलं नाही तर क्षणीक सुखाचा हा पदर उभं आयुष्य उगडं पाडून जातो.

            कुमार, मी तुला ओळखू शकले नाही.  तुलाच माझा आधार समजून तुझ्या खांद्यावर मोठ्या विश्वासानं डोळे मिटवून डोकं टेकवलं.  परंतु कुमार ज्यांना स्वतःला आधार नसतो ते इतरांना आधार देण्याचा प्रयत्न का करतात हेच मी आजपर्यंत समजले नाही.  तू ही तसाच, आधार नसलेला.  निराधार.  कुमार एक गोष्ट मात्र पुरती उमगली, की असे लोक इतरांना आधार देऊ शकतात परंतु तो भ्रामक, क्षणिक आणि अल्प संतुष्टी देणारा असतो.  असे लोक क्षणिक आधार देऊन घेणाऱ्याचं आयुष्यच निराधार करुन जातात......

            असुदे रे.  माझ्या मनातील दुभंगलेलं आकाश जोडण्यासाठी ग्रह-ताऱ्यांची लक्तरं देखील कमी पडली असती.  परंतु एका देवमाणसानं मला सावरलंय.  नाहीतर तुझ्या निर्दयी प्रेमानं माझ्या हातातील आयुष्य निसटून गेलं असतं.  पण कुमार, आजही माझ्या मनात तुझ्या बद्दल प्रेम आहे.  ते माझ्या अंतापर्यंत असेल.  कारण तूच सर्वप्रथम माझ्या जीवन सतारीची तार छेडलीस.  तिचा तोच झंकार आजही माझ्या भोवती एकांतात तोच नाद आणि तेच तरंग निर्माण करतो.  तुला आवडणाऱ्या गुलाबी साड्यांचा माझ्या जवळ ढीग पडलाय.  पण त्यातील एकाही साडीला तो रंग नाही जो तू दिलेल्या साडीला होता. 

            आपल्या प्रेमाच्या बागेतील जाईच्या कळ्यांचा सुगंध आजही माझ्या हृदयात दरवळतोय.  पण त्या तर केंव्हाच कोमेजून गेल्यात.   रोज पौर्णिमेच्या रात्री तोच चंद्र आकाशात येतो, पण आमच्या गावामागच्या निर्जीव थंड आणि संथ पाण्यात मरुन पडतो.  त्याच्यात ती शीतलता नसते.  त्याचे किरण येतात ते तुझ्या आठवणीचे शूल घेऊन पुन्हा पुन्हा ते क्षण माझ्या स्मृती पटलावर आणण्यासाठी.  ते शूल बोचून बोचून घायाळ करण्यासाठी.

            आजही मनाच्या मंदिरात बसवलंय व पुजा करतेय नित्यनियमानं तुझी.  पुजारीन बनून.  तूच प्रेम करायला शिकवलंस, डंख मारलेलं आयुष्य आणि विरहाच्या वेदना सहन करायला भाग पाडलंस.  गोड स्वप्नाचं मधाळ पोळं दाखवून हवं तेवढं लुटलंस.  हेतू साध्य झाल्यावर अश्वस्थाम्याची कपळावरील जखम माझ्या हृदयावर कोरून गेलास.  तू माझा विश्वासघात केलास.  का ते मी नाही विचारणार.  तरीही प्रश्न विचारते.  उत्तर स्वतःलाच दे.,  असं काय होतं जे माझ्यात नव्हतं पण तिच्यात होतं?  असं कोणतं सुख तिनं तुला दिलं, जे मी देऊ शकले नाही.....?

            कुमार तू माझ्या प्रेमाचा मला छान मोबदला दिलास, तुझ्या अंतर्मनातील कुरुप वासनेच्या कलंकाचा.  माझं शरीर आज दुसऱ्या कुणाचं असलं तरी मनस्वी आजही मी तुझीच आहे.  तुझ्या सहवासात अनुभवलेले भावविश्व आणि तू आता मला नकोस.  तुझ्या साथीत गमविलेल्या गोड क्षणांची विषारी स्मृतीयात्रा माझ्या जीवन यात्रेला पुरेशी आहे. 

            पत्राच्या शेवटी तिनं तिच्या मनातील व्यथा या कवितेनं व्यक्त केली होती –

तुझ्या वस्तीतून निघताना,

मी सर्वस्वी कंगाल झाले होते.

माझ्या स्वप्नांची प्रेते मीच ओढत होते.

तूच होतास ना देत दिलासा,

कलंक देऊन गेलास तूच असा.

नेत्रांतून सांडले स्वप्नांचे मोती

आज उमगले,

खोटीच तुझी प्रिती.

क्षणात एका आयुष्य फाटले.

कलंकाला असल्या जुनेर ते कुठले.

                                                                                सदैव तुझीच,                                                                                                               मनिषा.

            पत्र वाचून संपले.  माझ्या कानात प्रा. म.न. कवडे यांचे ते शब्द पुन्हा-पुन्हा घुमत होते.

            कुमार हे वयच असं असतं.  पण लक्षात घे या वयात असणारी ही गोष्ट म्हणजे वाढत्या वयाबरोबर भिन्न लिंगी व्यक्ती बद्दल असणारं एक अल्लड आकर्षण असतं.  ते खरं प्रेम नसतं आणि या वयात खऱ्या जीवनासाथीची निवड करता येण्याइतकी मानसीक कुवत नसते.....

-------*--------

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.

माझी लीव्ह व्हॅकन्सी..