क्रम नसलेला कार्यक्रम

 


भोपू सर म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकापेक्षाही बडं प्रस्थ.  सदऱ्यापेक्षा बनीयन मोठा, चहा पेक्षा किटली गरम असं म्हणतातना तसंच.  भोपू सरांचं राहणं जुण्या पद्धतीच्या टिपीकल मास्तरासारखं आणि बोलणं नव्या पद्धतीच्या टारगट पुढाऱ्यासारखं.  असा हा अजब समन्वय या व्यक्तीमत्त्वात होता.        

गुणोरीच्या ग्रामसचिवालयाचं बांधकाम वेगाने पूर्ण करुन घेतलं गेलं होतं.  जवळच एका कृषी मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री येणार होते.  त्याच तारखेचा मेळ साधायचा होता म्हणून धावपळ चालली होती.  ते आमच्या शाळेलाही भेट देणार अशी कुणीतरी आवई उठवली होती.  त्यांच्या स्वागताची तयारी करण्याच्या सूचनांसाठी सुपरवायझर भोपू सरांनी आख्खा एक मूल्य शिक्षणाचा तास घातला.  घोळून घोळून त्याच त्या सूचना माईक समोर उभे राहून विद्यार्थ्यांना ऐकवल्या.  स्वागत पद्यावरही मोठी लांबडी व बेचव सभाच त्यांनी झोडली.  माईकमधून बोलण्यामागे एक हेतु असतो, आवाज गावाला ऐकू जातो.  मग गाव त्यांच्या धडपडीची दखल घेतं अशी त्यांची समजूत होती.

             २४ फेब्रुवारीला त्यांनी स्वागत पद्याची रंगीत तालीम पाहिली.  एकदम भडकलेच.  पद्य बकवास आहे म्हणत मॅडमला एकदम मॅड ठरवून टाकलं.  तुम्हाला सस्पेंड होऊन घरी जायचंय का.  असा सज्जड दम भरला.  मुलींनाही, लाथा घालायला पाहिजेत.  साधा सूर धरता येत नाही.  असे गौरोवोद्गार काढले.  मुली दहावीच्या होत्या.  त्यांची विज्ञान प्रात्यक्षिकाची परीक्षा चालू होती.  त्यांना त्या परीक्षेचे टेंन्शन आणि वर भोपूसरांची ही भोपूगिरी.  त्यांनी आपली उपक्रमशीलता गावाला दाखविण्यासाठी मुलींना वेठीला धरलेलं होतं.  मुलींना असं झाडल्यावर, मुळात जी गोड गळ्याची म्हणून शाळेत प्रसिद्ध होती तिनं डोळ्याला रुमाल लावला.  तबला वाजवणारे सर तबल्यावरल्या गोल काळ्या शाई सारखे दिसू लागले.  मॅडम मात्र मख्ख सारख्या उभ्या होत्या.  त्यांना कदाचित या भोपूगिरीची सवय असावी.  माझा स्वागत पद्यात काहीच भाग नव्हता.  पण भोपू सरांनी मला थांबवून घेतलं.   माझ्यासमोरच हा सर्वांच्या पानउताऱ्याचा उपक्रम राबविला आणि ते हिरो सारखे झोकात वर्गाबाहेर गेले. 

            शाळा सुटली तेंव्हा गुणोरीचे माजी सरपंच निवृत्तीकाका शाळेत आले.  भोपू सरांनी मला त्यांच्या समोर कार्यालयात उभं केलं. हे पाठक सर.  सूत्रसंचलन करतील.  ( मी त्यांना नेहमी सांगायचो की माझे नाव वेदपाठक आहे.  पण ते नेहमी वेद काढून टाकत.  नंतर मीच ठरवलं, पाठक तर पाठक.  वेद साठी वाद नको.)  माझा होकार नकार ऐकण्याची आवश्यकताच नव्हती.  राजकीय गटातटांच्या कार्यक्रमात सूत्रसंचलन करणाराच अडकतो हा माझा जुनाच अनुभव होता.  खरं तर अशा कार्यक्रमात आपल्या हाती सूत्रही नसतं आणि संचलनही नसतं.  मात्र त्यातूनही शब्दांचा फास आपल्याला बसू नये याची काळजी घेत एकाच्या हातातील सूत्र आणि दुसऱ्याच्या मर्जीचे संचलन यांच्या मधून चालावं लागतं. 

            त्याच रात्री निवृत्तीकाका माझ्या खोलीवर आले.  मला त्यांच्या मोटारसायकलवर टाकून ग्रामपंचायत कार्यालयात नेले.  इथे सगळेच पुढारी वाटावे असेच होते.  त्यांचं वेगळं वर्णन काय करावं.  पण त्यातील एक जण मला काय आणि कसं बोलावं हे समजून सांगत होते.  त्यांचा आकार ठासून मैदा भरलेल्या पोत्याएवढा होता.  उलट्या रांजणावर मोठी कळकलेली तांब्याची जुणी घागर मांडावी असं मुंडकं त्या मैद्याच्या पोत्यावर होतं.  वरती धारदार टोपी.  धुंद वाटणारे बटाट्याएवढाले डोळे.  धापा लागल्यागत त्यांनी मला तपशील सांगीतला. 

            दुसऱ्यादिवशी सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही सर्व तिकडेच होतो.  सेवानिवृत्ती जवळ आलेले मुख्याध्यापक तसे मवाळ आणि प्रेमळ, पण कथित प्रटोकॉल म्हणून ते उपस्थित होतेच.  पण बेरकी पर्यवेक्षक स्थानिक पुढाऱ्यांसमोर आपली छवी उमटविण्याचा जोरदार प्रयत्न करत होते.  लगबगीच्या या नस्त्या उठाठेवीत भोपू सरांनी तर लाळघोटोपणाचा कळसच केला होता.  ( आजकाल नोकरीत हा अविभाज्य भाग आहे म्हणा.  जो यात जास्त प्रविण तो तेवढाच प्रभावी असे समीकरण असते. ) 

            कार्यक्रमासाठी सुंदर आटोपशीर व्यासपीठ, समोर मंडप, डी-झोन बाहेर नागरिक.  उजव्या बाजूला अधिकाऱ्यांच्या खुर्च्या.  डाव्या बाजूला पत्रकार कक्ष.  डी-झोन च्या आत सूत्रसंचालक बसण्याची व्यवस्था.  डाव्या बाजूला लगतच ग्रामसचिवालयाची इमारत.  अशी सभास्थळाची रचना होती.  साहेबांशी संपर्क झाला असून ते दहा मिनिटांत येतील, अशी सूचना कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून सकाळी दहा ते अकरा दरम्यान अनेक वेळा सांगून झाली होती.  दरम्यान शाळेचे विद्यार्थी आधीपासूनच सभास्थळावर आणून बसविली होते.  विद्यार्थ्यांचा कार्यक्रमासाठी उपयोग करु नये असा सरकारी आदेश असतो.  पण त्यांना, खासकरुन एम.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना ताटकळत रहावं लागलं. 

            आजकाल कसलाही क्रम न ठरता कार्यक्रम चालतात.  रेलचेल झालेल्या कार्यक्रमात कार्याचा मूळ होतु बाजुला पडतो आणि वेगळ्याच गोष्टींचा क्रम सुरु होतो.  पण तिथे कार्यकर्ते मात्र आपापल्या क्रमानुसार कार्य करत असतात.  झकपक शुभ्र कपड्यातील व्यक्तींच्या आदेशांचे पालन करत असतात.  आपापला झगमगाट स्वतंत्रपणे ठसठशीत दिसावा असा जोरदार प्रयत्न प्रत्येकनेच केलेला असतो.  परंतु सुकलेल्या चेऱ्याचा सामान्य माणूस या सगळ्या पुढे दिपून गेलेला असतो.  माझ्या नजरेतून हे सुटत नव्हते. 

डी-झोन च्या बाहेर नागरिकांमध्ये पुढेच, डोक्याला रंग उतरलेला कळकट तांबडा फेटा, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, ज्याची एक काडी मोडलेली असल्याने वळलेला दोरा बांधून कानात अडकवलेला.  सुरकुतलेला व वयाची पुरेपूर जाणीव करुन देणारा चेहरा आयुष्यभर उपसलेले कष्ट आणि भोगलेली दीनता याची प्रचिती देत होता.  पांढऱ्या मळालेल्या बंडीला दोन्ही खांद्यावर ठिगळं लावलेली.  विरलेले धोतर पायांच्या काड्या कसेबसे झाकत होते.  बाबा एक पायाची अर्धी मांडी घालून आणि दुसरा पाय घुडघ्यात दमडून त्यावर अर्धवट उघडलेल्या तोंडाच्या बोळक्याची हनुवटी टेकून बसले होते.  एक हात जमीनीवर आधाराला लावलेला, त्या हातात कसलासा कागद दुमडून धरलेला. दुसरा हात हनुवटीखालच्या गुडघ्यावर अंगाला चिकटून.  जाड भिंगाच्या चष्म्यातून डोळ्याची बुबूळं चांगलीच मोठी दिसत होती.  ती बुबळं एकाच व्यक्तीवर खिळलेली आणि ती व्यक्ती फिरेल  तशी फिरणारी.  मधुनच  शुन्य मनस्कतेने बाबा सगळ्या झगमगाटावर नजर फिरवत.  कोणाला तरी तो जमीनीवर धरलेला हात उचलून हातातला कागद दाखवत.  बहुदा त्यांना काही तरी निवेदन द्यायचे असावे.  पण ते ज्याच्याकडे पाहून हात वर करत होते त्याला कुठे त्यांच्याकडे पहायला सवड होती.

इकडे शुभ्र कपड्यांच्या भोवती हुजऱ्यांचे मुजरे आणि चाटुकारिता चालूच होती.  होय-बा उगाचच मधे मधे लगबग करत होते.  हेतु हा की आपला चेहरा आपल्या नेत्याने पहावा व आपल्या उपस्थितीची दखल घेतली जावी.  एरवी घरी तांब्याही न उचलणारे सतरंज्या टाक-उचल करत होते.  जणुकाही त्यांचा जन्मच त्यासाठी झालेला, इतकी त्यांची तन्मयता होती.  माझं हे सगळ निरीक्षण सरावानेच चालू होतं.  

एवढ्यात साहेब आले.  लगबगीनं फीत कापली.  व्यासपीठावर येताच शिवाजी महाराज, म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरींना पुष्पहार अर्पण केले.  "फोटोंचा क्रम वरील प्रमाणेच असेल.  त्याप्रमाणेच नावे पुकारा" अशी सूचना मला रात्रीच मैद्याच्या पोत्यानं दिली होती.  "नाहीतर क्रम चुकताला" असे सांगताना त्यांचे बटाट्या एवढाले डोळे गणेश डाळींबा एवढे झाले होते.  सत्कारासाठी तीस नावांची यादी माझ्या समोर होती.  त्यात तितक्याच वेळा फेरबदलही झाला होता.  आता खाडाखोडीने यादीची अवस्था पाहून माझं डोकं गरगरायला लागलं होते.  भाग नवा, माणसं नवी, कार्यक्रम राजकीय आणि मी सूत्रसंचालक.

मधेच बाहुबली ब्रिगेडच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार होणारंय असं सांगायला एक ब्रिगेडीयर अनेकवेळा येत होता.  खादीचा जुनाच पुढारी ड्रेस कांजी करुन घातलेला.  त्याचा लोकट फाटलेला.  पायतानाच्या वाद्या तुटलेल्या पण तरीही त्याला आजच पॉलीश केलेली.  ठोक्याच्या भांड्यागत भदाडं थोबाड.  बोटात कसल्या-बसल्या अंगठ्या.  सुपाएवढ्या दणकट तळहाताला दगडागत घट्टे पडलेले.  असे हे ब्रिगेडीयर हट्टालाच पेटलेले.  पण नेमकं त्यांचंच म्हणन पुकारायला संयोजकांची हरकत होती.  त्यांनी मात्र जिद्द धरलेली.

तो जवळ आला की, मी कसनुसं हसून गरीब चेहरा आणखी जमेल तेवढा गरीब करीत, आत्ता पुकारतो साहेब"गरीब करीत, आत्ता पुकारतो साहेब.ो.  ीचर  जीपचा हाता ना.  मी नाही म्ह म्हणायचो.  स्थानिक सहकाऱ्याकडे, हे संकट झेलून न्या या आशेने पहायचो.  नंतर त्या ब्रिगेडीयरने स्वतःच ही समस्या मिटवली.  माझ्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि त्याला जे पुकारायचं होतं ते पुकारून टाकलं.  एकवी गृहीत धरलेला असल्याने माझ्याकडे न पाहणाऱ्या संयोजकांच्या करड्या नजरा मात्र त्यावेळी टेबलाकडे वळाल्या.  आजही त्या नजरा मला जशाच्या तशा दिसतात. 

तेवढ्यात विरोधी पक्षाचे एक जिल्हा परिषद सदस्य तावतावाने आले.  आधी माझ्यावर उपसले.  काय सर आमच्या नावाची एलर्जी झाली काय.  शिकवायचं काम सोडून इकडं कशाला आलात.  शिकवायला कधी-कधी, पगाराला आधी-आधी, आन् आमच्या कार्यक्रमात नुसतं मधी-मधी. .... वगैरे वगैरे.  पुढं त्यानं त्यांच्या पक्षाच्या इरसाल पद्धतीनं संयोजकांसह सर्वांचाच उद्धार सुरु केला.  हे कसंबसं मिटलं.

उपमुख्यमंत्र्यांनी सरपंचांची लांबत चाललेली प्रस्तावना मधेच थांबवली.  त्यांच्या प्रस्तावनेत मुळात साहेबांशी आपली किती जवळीक आहे केवळ याचंच पाल्हाळीक वर्णन होतं.  साहेब बोलायला उभे राहिले.  त्यांच्या सचिवानं आधीच मला येऊन सांगीतलं होतं, स्वागत पद्य, हार-तुरे व इतरांची भाषणं होणार नाहीत.  दहावीच्या मुली तर तयारीनं बसलेल्या.  त्या तशाच हिरमुसून बसून राहिल्या.  विनाकारण मधे मधे फिरणारे भोपू सर आता स्टेजवर मागच्या एका कोपऱ्यात बळंच बसून कुठले घुसून होते. लहानपणी विदुषक होताना भेंडीचे कट केलेले टोक नाकावर चिकटावायचो तसे भोपुसर त्या गर्दीत चिकटलेले.  फोटोवाला आला की त्यांची मान पुढे निघून लांब व्हायची.  परीक्षा डोक्यावर असतानाही त्यांनी स्वागतपद्याच्या मुलींना वेठीस धरलं होतं.  

समोर नागरीक कमी आणि गर्दीसाठी आणलेले विद्यार्थीच जास्त ही बाब पाहून मुलांना उपयुक्त अशी संगणक व इंटरनेटची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी प्रसंगावधान राखत दिली.  त्यांच्या बोलण्यावर मागे भोपूसर किर्तनात तल्लीन होणाऱ्या श्रवणभक्तागत मान डोलवत होते.  साहेबांच्या या दहा मिनिटांच्या तासिकेसाठी विद्यार्थी चार तास ताटकळले होते.  एम.सी.सी. वाले तर उभेच होते. 

कार्यक्रम पारपडला आणि मला वाटलं माझी सुटका झाली.  पण दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या वळणावर माझ्या मागे ताडपत्रीचे हुड असलेली एक जीप येऊन थांबली.  त्यात प्रचंड काशीफळ भोपळा स्टे-रिंगवर हात ठेवून बसला होता.  त्याच्या शेजारच्या सीट वर तसलीच एक भोपळी होती.  भोपळ्यानं मला हाक मारली.

कावो SSSSSS सर, काल तुम्हीच व्हाता ना, निवेदनाला.

होय. मीच. का हो काका.

मला वाटलं काका चांगलं निवेदन केलं म्हणून कौतुक करतील.  पण ते गरजून म्हणाले,

त्या महाद्यानं काय गाव उक्त घेतलंय का.  माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.

..... नाय – नाय मी म्हण्तो, त्या म्हाद्यानं काय गाव उक्तं घेतलंय का तवा तुमी त्याचं कौतीक करत होता.  साळंला सुट्टी का दिली?  इथं काय शिकवत्यात का नाय?  चाल्लंय काय साळंत?”

 काका असं बलले की त्यांच्या शब्दाच्या ठेक्यावर शेजारची भोपळी खोचकपणे मान डोलवायची.  पण या प्रश्नांची उत्तर माझ्या अख्त्यारित नव्हती.  मी गारठल्यागत उभा होतो.  त्यांचं वाक्य संपल्यावर मी म्हणालो,

काका माझा काही पर्सनल इंटरेस्ट नाही.  तुमच्या राजकारणचं मला काय करायचं.  जेवढं सांगीतलं तेवढं बोललो." 

"त्या म्हाद्याचं नाव घेऊ नका म्हून निरोप दिला व्हाता ना."

 मी नाही म्हणालो.  खरं तर निरोप मिळाला होता.  पण दुसरी बाजू याच नावाला हायलाईट करायला लावत होती. 

.... मी येतो ना हेड मास्तराकडं ....  त्याच तावात काका जीपचा धूर आणि रस्त्यावरचा धुराळा माझ्या तोंडावर उडवत निघून गेले. 

झाला प्रकार भोपू सरांना सांगीतला.  त्यांनी धीर दिला.  पण पुन्हा तिसऱ्या दिवशी भोपळ्याच्या पोरानं टाँट मारलाच.  माझ्या बरोबर शाळेचे दोन शिपाई होते. 

हिकमतराव अजून दोन मास्तर तयार करा बोलायला.  टळा-टळा.  चांगलं घोटून घ्या त्यांच्याकडून.  आता मुख्यमंत्री येणारंयत गावात.

 बोलताना त्याची नजर माझ्यावरच होती.  पण माझी मात्र वाचाच बसली होती. 

परत शाळेकडे येताना कार्यक्रमाच्या वेळेचे दोन प्रसंग आठवले.  स्वागत पद्य रद्द झालं तेंव्हा ते रडवून तयार करवून घेतलेल्या मुलींपैकी एकीनं सभा संपल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती,  त्या भोप्याच्या थोबाडाचाच तबला केला पाहिजे.  डग्गा एका हातात घेऊन ती दात ओठ खात तळतळून बोलत होती.  विद्यार्थीनींची प्रतिक्रिया इतकी तिखट असू शकते हे माझ्या सारख्या नवख्या शिक्षकाला नवलाईचं वाटलं.

दुसऱ्या प्रसंगात, कार्यक्रमाला चोख बंदोबस्त होता.  लाईट व्यवस्था तपासायला आलेली महिला अधिकारी डेकोरेटरकडे काही रकमेची मागणी करत होती.  तेवढ्यात कार्तीक नावाचा एक पोलीस अधिकारी माझ्याकडे आला.  चेहऱ्याकडे पाहत म्हणाला,

तुम्ही टीचर का....

हो. सूत्रसंचलन करणारा शक्यतो टीचरच असतो का. . . . 

मी उगीचच भाबडा प्रश्न केला.  पण तो म्हणाला. 

नाही, तुमचा चेहराच सांगतोय, तुम्ही टीचर आहात ते. . . .

त्याच्या सुरात शिक्षकांबद्दलची अनास्था होती.  मी कसनुसा हसून गप्प बसलो.  एक मात्र समजलं की माझा जन्मच शिक्षकी चेहऱ्यानं झालाय.  मातृमुखी.


टिप्पण्या

  1. खूप छान घडलेला सर्व प्रसंग समोर चित्रित केलेला आहे

    उत्तर द्याहटवा
  2. खरं तर अशा कार्यक्रमात आपल्या हाती सूत्रही नसतं आणि संचलनही नसतं. मात्र त्यातूनही शब्दांचा फास आपल्याला बसू नये याची काळजी घेत एकाच्या हातातील सूत्र आणि दुसऱ्याच्या मर्जीचे संचलन यांच्या मधून चालावं लागतं. ...मस्त

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर...दर्जेदार विनोदी लेखन... अगदी डोळ्यापुढे सगळी पात्र उभी केलीत सर 😀

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.

माझी लीव्ह व्हॅकन्सी..