‘फिलगुड’करींचा आणखी एक प्याला
‘फिलगुड’करींचा आणखी एक प्याला
(हे स्वप्नातील एक स्वगत कथन आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
(विद्यामंदिरांवर ताले आणि मदिरालये खुलेआम चाले. शाला बंद ठेवणे ही मजबुरी आहे पण मधुशाला सुरु
ठेवणे हे अवघड दुखणं आहे. रांगा दोनच
ठिकाणी आहेत, पहिले ठिकाण रुग्णालये आणि दुसरे ठिकाण मदिरालये. पण दवा गायब आणि दारू मुबलक असलेल्या या
व्यवस्थेत दवा दामदुप्पटतेने मिळविण्यासाठी याचना आणि वणवण करावी लागतेय आणि दारू
मात्र घरपोच सुद्धा होतेय.)
सत्तेशी सत्याचे सतत युद्ध चालू असते. पण व्यक्ती सत्याची बाजू घेऊ शकत नाही, ही
कमजोरी माझ्यातही आहे. पण इथे सर्वजण
मिट्ट अंधाऱ्या भुयारातून गुपचुपपणे चालत आहेत.
असे वाटते या चालणाऱ्या प्रत्येकाच्या अंतरंगात एक आग धगधगत आहे. मात्र ते तिला आतल्या-आतच दाबून ठेवत आहेत आणि
त्याची वेदना प्रत्येकाच्या डोळ्यात साकळलेली दिसते आहे.
माझा हा अनुभव खूपच विचित्र
आहे. मी माणसांच्या या गर्दीला चिरून
जेवढा मुसंडी मारत पुढे जातो, तेवढाच स्वतःला मागे आणि एकाकी पडल्याचे पाहतो. गल्लीबोळातील अंधारातून धावतच राहतो. अंधाराला स्पर्श करत. आंधाराचे स्पर्शज्ञान अवगत करत. अंधारालाच सरावत जाणारी माझी जाणीव हळू-हळू
उजेडाला विसरू लागते. उजेड असतो हे
स्मृतीतून पुसूनच जाते. अंधारात कोणी दिसत
नसले तरी आता असल्याची जाणीव सहज होते.
पण मला माहीत होते की, या
काळोखात माझ्यासह आणखी असंख्यजण अशीच वाटचाल करताहेत. कोणी शुभ्र पांढरे कपडे घालून, कोणी हिरवे,
कोणी भगवे, पिवळे वस्त्र परिधान करून.
अनेकजण तर असे ज्यांचे वस्त्रच ओळखता येत नाही. पण या अंधाऱ्या गुहेतून चालणारांची संख्या मोठी
आहे. त्यात विविधताही खूप आहे. खरं तर अनेकजण अंधारातून चालत आहेत म्हटल्यावर
प्रवासात सहप्रवासी आहेत म्हणून भिती कमी
व्हायला हवी होती. पण उजेडात ज्यांना खूप
मोठे म्हणून ओळखत होतो ते अनेकजण इथे या अंधारात विचित्रपणे वागत होते. काही रांगत होते, काही खुरडत होते तर काही झुलत
होते. अंधारातही तोंड लपवून वावरत होते.
आश्चर्य वाटलं आणि समजलंच
नाही की, जे उजेडात उजळ माथ्यानं वावरत होते ते इथे अंधारातही तोंड का लपवताहेत? त्यांना असे करावे
असे का वाटत होते?
पण ते इथं काय करत होते? या प्रबोधनकारांना, या धर्माधिकाऱ्यांना, या
राजनीतिज्ञांन, या धुरंधर समाज सुधारकांना, या शिक्षण महर्षिंना, या पवित्र
मार्गदर्शकांना अंधारानं का वेढलं? की मी एकटाच चुकून अंधारात आलो नसून अंधारच
सर्वत्र दाटून आलाय आणि सर्वजणच अंधारच्या वेढ्यात अडकून पडले आहोत.
पण यांचे ते सामर्थ्य कुठे गेले, जे अंधार दूर
करू शकत होते. नव्हे-नव्हे ते कुणालाच
अंधारात जाऊ देत नव्हते. प्रत्येकाला
मार्ग देत होते. हा अंधार तर खूप वाईट
आहे. याच्या पोटात सर्व काही भ्रष्टच घडत
आहे, भ्रष्ट होत आहे. मग या भ्रष्ट
मार्गावर हे सर्व श्रेष्ठजन कसे आले? की ते वाट चुकले? छे ..... ते कसे वाट चुकतील! ते तर समाजाचे वाटाडे ना! पण.... जर असे काहीच नाही, तर ते
अंधारात कसे? की हाच
यांचा खरा चेहरा?
ज्यांना आपण इथे आहोत हे इतरांना समजू द्यायचे नसते, तेच चेहरा लपवत
असतात. आज यांच्या चेहरे लपविण्याचा अर्थ
काय? म्हणजे चेहरे
लपवून नित्याने अंधारात यांचे येणे-जाणे आहे तर? म्हणजे हे अंधारातील गुन्हेगार, उजेडात
सभ्यतेचे सावकार आणि सेवेचे ठेकेदार इथे तोंड काळे करायला आलेत तर. . . .
अरे काळतोंड्यांनो, काळ
तुम्हालाही आपल्या तोंडात धरणारंय. घास
तोंडात जसा येईल तसा चावला जातो. काळाच्या
तोंडातील दात कुणाचाही निवाडा करत नाहीत किंवा चावण्यासाठी कुणाचाही क्रम ठरवत
नाहीत. हे कसले घोर अपराध इथे घडताहेत? अरे तुम्ही तर
मातृगमन्यापेक्षाही अघोरी पाप करताय. इथे
तर अंधारात तुम्ही मातृभूमीची निर्लज्जपणे अब्रु लुटत आहात. जिची अब्रु सांभाळण्याची स्पर्धा असावी तिची
अब्रु लुटण्याची ही कसली विकृत स्पर्धा? सीमेवरच्या प्रहरींना विसरालात काय, जे उभे
आहेत रक्त मांसाच्या चिखलात रूतवून पाय.
प्राणांहून अधिक काय प्रिय असते? जा त्या सैनिकांना विचारा मग मिळेल
उत्तर. पण ते तुम्हाला समजेल का.
हे कसले घोटाळे, स्टँप नकली,
रुपये नकली, ती पहा सरकारी जमीन कोणी विकली.
अरे हे काय ही तरूण मुले धावत्या रेल्वेतून कोणी खाली फेकली. आज एसीड टाकले, उद्या रूळ उखडले, अरे तुम्ही तर
तान्ह्या बाळांचेही ओठ बाटवले. बाटली आणि
पिशवीच्या दुधात गटाराचे पाणी घातले. कुठे
किडणी काढली तर कुठे रक्त विकले. आता तर
पहा श्वासांवरीह तुम्हीच नियंत्रणात मिळवले.
हवा तुमची, ऑक्सीजन तुमचा, नळी तुमची पण आमचे नाक-छाती गुदमरलेलीच. हवेतही तुम्ही विष कालवले. कालवले तर कालवले जगण्याचे सारेच दीप
मालवले. दाटलेल्या अंधारात अंधाराचाच दिवा
आणि त्या दिव्यावर तुमचाच दावा. कशासाठी
हा सगळा बेईमान कावा?
सत्तांधांनो सत्ता तुम्हाला उक्तीच दिली. पिढ्यांन-पिढ्यांची सक्तीही दिली. आता तरी आमच्या हवेत ऑक्सीजन सोडा, जगण्याचा
हक्क द्या आम्हा थोडा. तुमच्या त्या
खोक्यात, वेगळेच डाव तुमच्या डोक्यात.
कशाला भर्ती व्हावे सगळ्यांनी मरणाच्या दारात. खात्रीने येणार होती मर्तीकाची लाट तरी पांढरे
फटक तुमचे करतुकाचे ललाट. कोण इथे वाली,
वाल्मीकींच्या वेशातील वाल्या तुम्ही झालात.
असा कसा उलटा प्रवास सुरू केलात.
आणखी किती कवट्यांची माळ हवी, आणखी किती चितांचा जाळ हवा. दफन झालेत आक्रोश इथले. इतके तुम्ही बधीर कसे? मृत्युच्या लाटेसाठी
अधीर कसे?
माय-बाप तुम्ही की विषारी साप
तुम्ही. किती वेळा देता, जगण्याची थाप
तुम्ही. तुम्हीच महाराज. विकलेल्या भक्तांचेच सारे राज. मरणाच्या गुडुप अंधारात, गायब झालेत सारेच
आवाज. कोणी कोणाला आवरावे आणि कोणी कोणाला
सावरावे?
कावऱ्या-बावऱ्या साऱ्यांना कोणी धीर धरा म्हणावे? अंधारलेल्या या जगात अंधारलेले व्यवहार
पसरले. अंधारच पिऊन अंधाराचे धारकरी
सरसावले. कापा-कापा सोप्याच आहेत साऱ्या
माना. खूपच ऐकल्यात तुमच्या ताना. कोण कोणाला कापतो, अंधार जीवन व्यापतो. अंधारलेले तुमचे भाषण आणि आम्हीच सोपवलेले आमचे
शोषण. मुबलकच आहेत माणसे ढकला त्या
निर्जीव अंधारात हवी तितकी. ओरबाडा सारेच
प्राण आणि मारा एकच अखेरची टिचकी.
पुन्हा पहाट होईल हा आशावाद धरून बसणारे या अंधारातही धावतायेत. मृत्युचे अंतर तोडून टाकण्यासाठी. नव्या आशावादाच्या प्रकाशाचे काही पुंज मुठीत बंद करून योग्य वेळ शोधताहेत, ते काजवे सूर्य होण्यासाठी उधळण्याची. त्यांचेही हात आता थकलेत, त्या उर्वरित थंड तेजपुंजांनी भाजलेत. पण ते हात पकड सोडत नाहीत. जीवनाला जगविण्याची आपली अकड सोडत नाहीत. तोच तर आहे धागा, या अंधारातही जागते रहो म्हणत जीवन ठेवतोय जागा. आमची ही आशा आणि त्यांचा तो वाद जोडून नव्या आशावादाचा दावा केला जातोय, हे या अंधारातील शुभसंकेत आहेत.
एकाएकी अंधारात कानाजवळ कोणी
तरी कुजबुजलं.... “अरे हे कलंकी युग आहे. सगळेच कोणत्यान् कोणत्या कलंकानं कलंकीत
झालेत. एखादा सत्यवादी जन्मला तर तोच ‘बुटाने पाणी प्यायलेला’ ठरवला जातो. देव, देश आणि धर्म ही सगळी सत्ता आणि मत्ता
ताब्यात ठेवण्याची साधनं बनवली जातात.
त्या साधनांवर कायमचे हक्क सांगीतले जातात. हक्कासाठी हट्टाला पेटलेले असा अंधार
पसरवतात. निवडणुकांच्या काठावर हा अंधार
आपल्या नसानसात बेमालूनपणे उतवरला जातो.
मग समाजालाच अंधाराची नशा होते, लक्षात
ठेव, असा अंधारलेला समाज आपल्याच नाशास कारणीभूत होत असतो. लक्षात ठेव हे जीवन क्षणभंगूर आहे. पण क्षणा-क्षणाला माणूसकी भंग पावत आहे. भंगलेलं दुभंगतच जातं, तसं आता इथं होत आहे.”
मी म्हणालो, “यावर उपाय”?
तो म्हणाला, “क्षणभर बरं वाटण्यासाठी आहे.
कायमस्वरूपीचा उपाय काहीच नाही. पण
क्षणभर बरं वाटण्यासाठी पुढचे अनेक क्षण पणाला लावावे लागतील. पुन्हा-पुन्हा बरं वाटण्याचा आधार शोधत रहावं
लागेल.”
मी म्हणालो, “चालेल. दे तो उपाय माझ्या हातात.”
समोर कोणीच नव्हतं.
पण अंधारातून दोन जादूचे मोठे हात पुढे आले. अगदी माझ्या अंधारलेल्या घराच्या दारापर्यंतचा
मार्ग त्यांनी शोधला, तेवढं त्यांचं तंत्र विकसितच झालंय. त्या हातात काही तरी लपवलेलं होतं. ते माझ्या हातात ठेवत तो दाट अंधारातून येणारा
आवाज पुन्हा बोलू लागला.
“हे घे हे औषध, या एकाच प्याल्यात आहे. उद्या ते प्रत्येक प्रकारच्या दुकानात
ठेवण्याचा राष्ट्रउद्धारकांचा कट आहे.
त्यात प्रत्येक कथित भाग्यविधात्यांचा वाटा आहे. मला खात्री आहे, ते औषध नक्कीच नकली असेल. लेबल विदेशी आणि ‘द्रव’ देशी असेल. ती भेसळही
पौगंडावस्थेतील पिढीलाच लवकर पांगळं करण्यासाठी पुरेशी असेल. ही मरणाची लाट तर किरकोळ आहे. या लाटेतही हे द्रव मुबलक वहात आहे. ते मिळविण्यासाठी आजही अनेकजण आपले जीवन पणाला
लावून मरणाला वाहत आहे. सुरूवातीला हे
द्रव स्वस्त असेल. ते पुरविणारा त्याची
चटक लागण्याची वाट पाहत असेल. जसं ज्ञान
स्वस्त झालं की त्याचं महत्व वाटत नाही, तसं समाजातील प्रत्येक घटकाला तिची, त्या
भेसळीची गरज असल्याचं ज्ञान झाल्यावर तिची मगाणी बरोबर किंमत वाढेल. इतकी की घरातील किडुकी-मिडूक विकूनही हे द्रव
विकत घेण्याची स्पर्धा असेल. गरजवंताला
अक्कल नसते. म्हणून तो ज्ञानी असला तरी
आपलं ज्ञान, शील, चारित्र्य सर्वकाही विकून तो ते औषध घेतच राहील. त्याच्या प्रभावाने क्षणा-क्षणाला त्याला बरं
वाटत जाईल. तस-तसा विक्रेत्यांचा व
निर्मात्यांचा आणि विक्रीचे मार्ग प्रशस्त करणारांचा विकास होत जाईल. देश मात्र भकास होत जाईल. विकासासाठी हे औषध एकमेव आधार बनलेला असेल.”
“हा घे हा प्याला. हा एकच असला तरी मी याला, ‘आणखी एक प्याला’ नाव दिलंय. कारण हा एकदा घेतला की प्रत्येकजण आणखी एकदा, आणखी एकदा, आणखी एकदा मागतच राहतो. देणाराही उदार असतो. जवळ पैसा असू दे - नसू दे तो उधार रहायला तयार असतो. त्याला माहीत असतं या उधारीची धार त्याच्या मानेवर अशी फिरेल की कधी गळा कापला गेला हे त्याला त्या झींगलेल्या अवस्थेत कळणारही नाही आणि त्यांच्या माळेत आणखी एक कवटी गोवली जाईल......हा ‘फिलगुडकरीं’चा कधीही न संपणारा आणखी एक प्याला आहे आणि इथे तर सारेच सत्तेचे फिलगुडकरी आहेत. गुड फिल होण्यासाठी अंधारलेल्या जादूचे प्रयोग सुरूच आहेत.
(c) भरत वेदपाठक, औरंगाबाद

खूप छान सर. अप्रतिम. व्यवस्थेवर अचूकपणे प्रहार केलाय.
उत्तर द्याहटवासरजी...., सलाम तुमच्या लेखणीला....,व्यवस्थेच्या
उत्तर द्याहटवाउत्तरीय तपासणीच केलीय.. !!!
दत्ताभाऊ धन्यवाद
हटवा