एका खुषीची दुसरी गोष्ट

                                          

                                     एका खुषीची दुसरी गोष्ट

(ही एका अशा पराभवाची कथा आहे ज्यात या चिमुरडीची कथा नव्हे व्यथा आहे.  तिचे नाव खुषी.  पण तिच्या वाट्याला खुषी आलीच नाही.  पराभव खुषीचा झाला की व्यवस्थेचा?)  

तांदणं.... तांदणं झाली रात..... तांदणं.... तांदणं झाली रात...... बोबड्या बोलण्यानं तिच्या या ओळी आणखीनच मधूर वाटत.  रोज संध्याकाळी ती या ओळी गुणगुणायची.  इटुकलीशी ती, या महागड्या हॉस्पीटलच्या प्रशस्त, चकाचक पण खचाखच भरलेल्या जनरल वॉर्डमध्ये साधारणपणे आठ दिवसांपासूनच होती.

            तशी साधारण वाटणारी ती तिच्या बेडवर कधी नसायचीच. जनरल वॉर्डमधले सगळे बेड तिचेच.  कधी या मावशीच्या बेडवर तर कधी त्या दादाच्या बेडजवळच्या खुर्चीत पाय हलवत त्याच्याशी गप्पा मारत बसलेली.  इवलेस्से हात, हातवारे करत बोलताना बाहुलीसारख्या पापण्या आणि काळेभोर डोळे.  मनानेच तयार केलेली गावाकडची गोष्ट सुरू असायची.   ओठांचा चंबू.  बोबड्या बोलीत जिंकून घेणारा गोडवा, चेहऱ्यावरील उत्कट निरागसता बोलण्याशी खीळवून ठेवणारी.  अँडमीट असलेल्या दादाचा एक हात सलाईन लावल्याने लांबवलेला, दुसरा हात उशीवर डोक्याखाली ठेऊन ऊंचावलेला आणि मान वाकडी करून तिच्या बोलण्यात एकाग्र झालेली नजर.

तिला काही सांगीतलं आणि नाही आवडलं तर तोंडातल्या तोंडात `च्याक` करत त्यावर तिचे हावभावयुक्त काल्पनिक विश्लेषण सुरू असायचे.   ही सगळी कृती समोरच्यासह जनरल वॉर्डमधल्या सर्वांना तिच्याकडे एकटक पहात बसायला भाग पडत होती.  शेवटी डाव्या तळहातावर उजवा तळहात घासून झटकन सोडत, ``दादा तुला तल काही कलतच नाही.  जा मी नाही बोलणाल.``  असं म्हणत ती मग दुसऱ्या बेडवर जाऊन बसायची.  इथे प्रथमच भेटणारा तो दादा अजारपण विसरून तिच्या निरागसपणावर खळखळून हसायचा.  तो, ``अगं ए... चीऊ ताई.... ईकलं तल ये..... थांब ना...`` अशी बोबडी हाक मारायचा.  पण ती मागं वळत ठेंगा दाखवत, ओठांच्या चंबूतून जीभ बाहेर काढत वाकुल्या दाखवते.  पुढे डिस्चार्ज मिळणार असलेल्या मांडी घालून बसलेल्या थोराड मावशीच्या समोरच कशीबशी बेडवर चढून मांडी घालून बसते.

मावशीच्या तोंडाकडे पाहण्यासाठी वर मान करत, ``काय मावछी ताल्ल्याना मला थोलून.  नाही म्हणाला व्हता.  खोतं बोल्ताय ना....``  असं बोलली की मावशी तिला कवटाळून पटा पटा मुके घ्यायची.  मावशीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या.  ``व्हयगं माझी भावली.  बरं वाटल्यावर कशाला थांबू इथं.  पण डॉक्टरच्या औषधानं नाही, तुझ्या बोलण्यानं गुण आलाय बघ मला.  तू पण लवक्कर बरी हो.  मी येईल तुझ्याघरी तुला भेटायला.  `` तशी ती मावशी समोर उभी राहून इवल्याशा हातांनी तिचा चेहरा हातात घेत म्हणायची, ``मावछी तू पण येणाल देवाघली ?  मला भेटायला ?  घली आजोबा थांगायचे माणसं गेली की देवाघली जातात.  गेली की म्हणजे कुथं ग जातात माणसं....?  मावछी.....!``  हे सगळं ती सहज साध्या प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणायची.

एवढा मोठा जनरल वॉर्ड.  गजबजलेला.  पण तिच्या या वाक्यानं जीवघेणा शांत व्हायचा.  मावशी, आजोबा, दादा, ताई, काकू, बाबा, या प्रश्नावर कसनुसा चेहरा करीत तिला कवटाळून घ्यायचे.  काय करावं या पोरीच्या प्रश्नाला. . . या प्रश्नावर जीव वाचवण्यासाठी आलेल्या व ठीक झालेल्यांचा जीव कासावीस व्हायचा.  तिची कथा सगळ्यांना समजायची. त्यामुळे तिच्या या प्रश्नापुढे सगळे हतबल असायचे.  मरण कुणलाच चुकलं नसलं तरी मृत्यु म्हणजे काय आणि देवाच्या घरी कधी जातात याची समज नसलेलं तिचं वय हा प्रश्न घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून या वॉर्डमध्ये फिरत होतं.  सगळे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत.  तशी ती सुद्धा काही ठरवून विचारत नव्हती.  पण कधी तरी ओघाने तो प्रश्न वॉर्डवर आघात करायचाच.  वॉर्ड शांत झाला की नर्सच्या लक्षात यायचं की इतकावेळ हलकं फुलकं वातावरण करणाऱ्या या चिमुरडीने सगळ्यांना गंभीर केलंय.  पटकन ती आपल्या खुर्चीतून उठून या चीमणीला उचलून घेत तिच्या बेडवर बळंच झोपवताना,  ``काहीही बोलते..... देऊ का एक लट्टा....`` असं म्हणलं की ती भिंतीकडं तोंड करून मुसमुसत म्हणायची, ``माल . . . . माल. . .  मालूनटाक मला. . . . देवाकलं गेल्यावल तुझं नाव सांगणालंय. . . .``  सुन्न वॉर्डचे डोळे पाणावयचे.  एरवी कठोर असणारी नर्स पटकन तिच्या गालावर ओठ टेकवत, ``अगं, तसं नाही गं . . . तुला तांगलं होऊन घली जायचंय ना....`` एवढ्यावर ती नर्सच्या गळ्यत पडून तिला पटकन एक पापा देत म्हणायची, ``मग मला लागवलणाल नाही ना. . . .``  काळजाला भिडणारे हे प्रसंग पुन्हा पुन्हा पहायला मिळत होते.  तिचा राग किंवा तिटकारा कोणी करत नव्हतं.  करणार तरी कसा.

डिस्चार्ज मिळणारे जाताना तिला बिस्कीट पुडे आणि फळं देऊन जात. आल्यापासून तिच्या अंगावर एकच पोलकं बरेच दिवस होतं.  एका जोडप्यानं तिला नवा फ्रॉक आणला.  तो घातल्यावर त्याची दोन टोकं बोटांच्या चिमटीत पकडून झगमग फ्रॉक तिने दुडू दुडू धावत सगळ्या वार्डला दाखवला.  हरखून उड्या मारू लागताच स्टाफ आणि डॉक्टर पळत आले.  तिला उचलून घेत बेडवर बसवलं.  काळजीच्या रागात तिला, ``आता सलाईन लावून बांधूनच टाकतो`` म्हणाले.  उड्या मारल्याने काळसर झालेला तिचा उत्साही चेहरा मलूल झाला.  तिचा चेहरा फार बोलका होता.  शब्दाविना सगळे भाव तिच्या चेहऱ्यावरील रेषा हलली की वार्डला कळायचे.

पण नव्या फ्रॉकवर खुष होऊन मारलेल्या उड्यांनी तिचा श्वास फुलला होता.  हातपाय काळे पडू लागले तसे डॉक्टरही घाबरले.  मुख्य डॉक्टरही धावत आले.  तातडीने उपचार सुरू झाले.  मुख्य डॉक्टरांसमोर ती चिमणी अगदी निपचितत पडून राही.  त्यांची तिला भिती वाटे.  त्यांच्या राऊंडच्या वेळी अनेकदा ती कुठल्यातरी कोपऱ्यात छतीशी बाहुली धरून लपून बसायची.

तिच्या हृदयाचे कसलेसे ऑपरेशन व्हायचे होते.  ते न झाल्यास ती थोड्याच दिवसाची सोबती होती.  शालेय आरोग्य तपासणीत तिच्या या आजाराची तिव्रता समजली आणि तिला या मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला होता.  तिला कसलीच धावपळ करायची नव्हती. खरं तर धावत पळत खेळण्याचे तिचे वय पण आजाराने असं खुटवून ठेवलं.  तरी ती वार्डभर मिरवत होती.  खूप वेळ सलग बोलल्याचाही तिला त्रास व्हायचा.  मग तिला बोलू नको म्हणून सांगीतलं की ती आजारपणापेक्षाही जास्त कोमेजून जायची.  पण तशी ती गप्प बसली की वार्डही कोमेजून जायचा.  बोलू द्यावं तरी अडचणं. गप्प बसवावं तरी तिचा कसनुसा चेहरा काळीज पीळवटून टाकायचा.

वार्डमध्ये दरम्यान किती आले आणि बरे होऊन गेले.  ही चिमणी काकांनी पैसे आणले नाहीत म्हणून थांबलेल्या उपचारामुळे मुक्काम लांबवून होती.  ती इवल्याशी बाहुली पण कमरेपर्यंतचे केस आता विरळ होऊ लागले होते.  ग्रामीण भागातून आलेली आणि तिची व्यथा समजलेली कोणतीही महिला तिची वेणी-फणी, आंघोळ, जेवण आणि औषधाची वेळ पाहत होती.  त्यामुळे तिच्याजवळ काळजी घेणारं नात्यातलं कोणीच नसलं तरी तिचं काहीच अडलं नव्हतं आणि कोणी आलं नाही याची खंतही तिला नव्हती.  खरं तर तिला नात्यात्याल्या कोणाची ओढच नव्हती पण इथं ती सगळ्यांच्या नात्यात होती.

एकदा नवख्या महिलेनं सहज विचारलं, ``तुझी आई कशी नाही आली गं तुला बघायला.  `` तशी ती बेड वरून उतरली.  बोट धरून त्या महिलेला वार्डमध्ये फिरवलं.  आईच्या वयाच्या वाटणाऱ्या आणि कधी ना कधी तिची वेणी-फणी केलेल्या प्रत्येक महिलेकडे बोट दाखवून ती मोजू लागली,  ``एक, दोन, तीन, चाल, पाच. . . . हे बघ या सगल्या माझी आईच आहेत. . .``  यावर गलबलून गेलेल्या त्या वार्डचे चित्र रंगवणारे शब्दच नाहीत.  त्या दिवशी या सगळ्या आया तिच्या बेड जवळ वात्सल्याने बसून होत्या.  ती त्यांच्यामध्ये बसून तीचं आवडतं गाणं,  ``तांदणं..... तांदण झाली लात. माज्या देवाची पहात होत वात.....``  हे गाणं म्हणत होती.  तिच्या कोवळ्या आवाजात ते गोड वाटायचं.  पण थोड्याच वेळात तिचा श्वास फुलू लागला.  तसं त्या सगळ्यांनी तिला गप्प बसवलं.  इतक्या सगळ्यांच्या प्रेमाने भारावलेली चीमणी भावनावश झाली.  त्यामुळे तिच्या हृदयावर आणखीनच ताण पडला.  हातापायांना मुंग्या आल्यागत ती निपचित पडून राहिली.  ज्युनीयर डॉक्टर आले.  त्यांचे सोपस्कर करता करता म्हणाले, ``काय करावं या पोरीला. गप्प बसलेली पहावत नाही आणि बोलू लागलेली काळजीत टाकते.``  तशा तिच्या सगळ्या आया डोळ्याला पदर लावत उठून गेल्या.  तिला शांत झोप लागली होती. . . . .

तिचे आई वडील शेतमजूर.  शेतमजूर हा एक शब्द सांगीतला की दारिद्र्याची कर्मकहाणी वेगळी सांगण्याची गरज उरत नाही.  परंतु तिच्या काकाची स्थिती बेताची होती.  तेच तिला सांभाळत होते.  असल्या बोलक्या बाहुलीला कोण जीव लावणार नाही आणि कोण सांभाळणार नाही बरं.

सुगीचे दिवस असल्याने सगळे नातेवाईक पोटाच्या मागे लागलेले.  तशात काकानी तिला या दवाखान्यात सगळ्या सरकारी कागदासहीत आणून सोडले आणि गेल्या दहा दिवसात तिच्याकडे कोणीच फिरकले नाही.  सरकारी योजनेतूनच तिचा सगळा खर्च होणार होता.  परंतु काकांना दवाखान्याने काही रक्कम भरायला सांगीतली होती.  तजवीज करायला गेलेले काका अकराव्या दिवशीही परतले नव्हते.  ते जमेल त्या नातेवाईकाचे दार ठोठावत पैसे मागत असल्याचं तेवढं कळलं.  दरम्यान स्वभावामुळे ती एकटी नसायची.  रात्री वॉर्डमधलं कुणीही तिला झोपवलं तरी खुर्चीत तिचाच नातेवाईक असल्यासारखं तिथेच झोपायचं.  तिचं तीथं कोणीच नसलं तरी ती सर्वांची होती.  ते सर्व तिच्या वाचण्याची मनोमन  प्रार्थना करत होते.

ज्युनियर डॉक्टरांचा राऊंड आला आणि ती तिच्या बेडवर नसली की डॉक्टर गळ्यात टेथास्कोप, दोन्ही हात कंबरेवर आणि नजर सर्व बेडवर फिरताना एकच वाक्य पुटपुटायचे, ``कुठे गेली ही भोरडी. सारखी भुर्रर्र भुर्रर्र फिरत असते.``

            पण आज संध्याकाळी ती संगळ्यांच्याजवळ जाऊन थोडा थोडा वेळ बसली.  खूप सावकाश चालत आणि संथपणं मलूल चेहऱ्यानं बोलत ती जणू निरोप घेत होती.  तिने सगळ्यांना सांगीतलं,  ``उंद्या मी जाणालंय.``  कुठं विचारलं तर, ``देवालाच माहीत.``  एवढंच बोलत होती.  तिला मोठ्या डॉक्टरांनी सांगीतलं होतं.  तुला उद्या परत जायचंय.  त्यावर ती कोमेजली होती.   रुग्णालयाच्या वेदनामयी वार्डमध्ये ती खरं तर तिच्या सगळ्या वेदना विसरली होती.  तिचा जीव चक्क हॉस्पीटलमध्ये रमला होता. सगळ्या अनोळखींशी गप्पा मारताना जणूकाही गावाकडच्या दरिद्र्याच्या भीषणतेला विसरायची.  या रुग्णालयाच्या चकचकीत फरशीवर खुष होऊन कधी कधी उगाचच फरशी निरखत फिरायची.  जणूकही येथे येऊन तंदुरूस्त होऊन गेलेल्या संगळ्यांच्या पायाचे ठसे तिला दिसत होते.  त्यातच तिची चिमूरडी पावलंही तिला गवसतात का हे ती पहात असावी.  सगळ्यांना आनंद वाटणाऱ्या या चिमुरडीचं दोनच दिवसापुर्वी एका जोडप्याने नामकरण केलं होतं, खुषी. सगळ्यांना आपल्या लावी बोलण्याने खुष करणारी खुषी.

            त्याच संध्याकाळी आम्ही हॉस्पीटल सोडलं.  जाता जाता खुषी येथून ऑपरेशन न होताच जाणार याची रूख रूख व असं का हा प्रश्न सतावत होता.

            आठवड्यानंतर सहज म्हणून तिचे काय झाले पाहण्यासाठी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.  दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचे काका आले.   वार्डमध्ये मुख्य डॉक्टरही होते.  कळकटलेले काका त्यांच्यापुडे झुकल्या मानेने हात जोडून उभे होते.  वातावरण गंभीर होते.  तिच्या बेडजवळच्या कोपऱ्यात त्यांची काय कुजबूज झाली ते इतरांनी समजलं नाही.  पण काकांनी सदऱ्याच्या बाहीनं डाव्या हातांनी डोळे पुसले.  खुषीचं उरलं सुरलं सामान एका हातात आणि दुसऱ्या हाताने खुषीला धरून बाहेरचा रस्ता धरला.  जाताना खुषीनं वळून पाहत ओठ आवळून धरत एक आशाळभूत रडवेली नजर वार्डभर फिरवली, तेंव्हा सगळा वार्ड नि:शब्द उभा होता.  तिचा जीव गुंतला होता हॉस्पिटलमध्ये.

            तिला असं का जावं लागलं. . .  . काका तिच्यासाठी हॉस्पीटलनं सांगीतलेल्या अनामत करमेची पूर्तता करू शकले नव्हते.  त्यांनी भरलेली थोडीशी रक्कम आजवर तिच्या येथे थांबण्यावरच संपली होती.  खरं तर सरकारी योजनेत ते सर्वकाही मोफत होणार होतं.  पण हॉस्पिटलचं बजेट माणूसकी आणि खुषीच्या खुषी पेक्षा मोठं होतं.  हॉस्पिटलच्या बजेटला भावना नसतात.  शस्त्रक्रियेच्या शस्त्रासारखे ते असते.  त्याच्याशिवाय पुढच्या क्रिया होतच नाहीत.  वार्डमधल्या त्या सगळ्या आयांची स्थिती एकीनं खुषीच्या उषाला ठेवलेल्या एकवीरा देवीच्या फ्रेमसारखी झाली होती.  मात्र सगळ्यांच्या कानात, `चांदनं चांदनं झाली रात, माझ्या देवाची पहात होते वाट` हे गाणं घुमत होतं.
            ती घरी गेली खरी
, पण . . . . कदाचित ज्या देवाची ती वाट पाहत होती, तोच देव तिची वाट पाहत असावा.
 आठवडाभराने एक दिवस तिचा श्वास फुलला.  डोळे खोल गेलेले, नाकपुड्या बळंच फुगवून ती हवा आत घेण्याचा प्रयत्न करत होती.  तिच्यासारखंच काळवंडलेलं घरातलं दारिद्र्य हतबलं होतं.  ती शेवटी ते गाणं बळंच पुटपुटत होती.  ``तांदण तांदणं झाली रात.  माझी देवच पहात होता वात. . .  . `` एका दीर्घ श्वासाच्या प्रयत्नात तिच्या प्राणांचं चांदणं मावळलं.  शेवटी तिच्या हातात वार्डातल्या एका दादानं दिलेली आणि मोठे डॉक्टर आल्यावर लपून बसताना छातीशी धरायची ती बाहुली आवळून धरलेली होती.  बहुतेक आयुष्य हिरावून घेणारा तो यम नावाचा जगण्यावर कायमचा उपचार करणारा कथित `डॉक्टर` येताना तिला दिसला असावा म्हणून तिनं बाहुलीला घट्ट धरलं होतं.  आता ती बाहुली आणि ही बाहुली दोघीही निश्चेष्ट होत्या.

खेळण्यातील बाहुल्यांची मोडतोड झाली तर दुसरी आणता येते.  पण जीवनातल्या या बाहुल्यांचं काय.  खुषी खूप आनंदनं लढत होती.  कदाचित तिला तिचा लढाच समजला नसेल.  पण तो सगळ्यांना दिसत होता आणि समजतही होता.  याखरं तर ही एक पराभवाची लढत होती.  या छोट्याशा निकराच्या लढातीत पराभव कोणाचा झाला?  खुषीचा? की व्यवस्थेचा?

(c) - भरत वेदपाठक, औरंगाबाद.

       मो - 9922419242

टिप्पण्या

  1. अतिशय हृदयद्रावक आणि व्यवस्थेचे वास्तव चित्रण मांडणारी कथा👌👌👌

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. . फारच वाईट वाटलं . एकाही डॉक्टरला मदत करावी वाटली नाही . सगळ्यांनी मिळून मदत केली असती तर ...

      हटवा
  2. अतिशय काळजाला हात घालणारी, डोळ्यामध्ये पाणी आणणारी कथा....

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच हृदयस्पर्शी अशी घटना आहे
    खुशीन स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांना खुशीत ठेवण्याचा प्रयत्न केला
    जीवनात सुद्धा असे अनेक लोक आपले दुःख लपवून दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात
    खूपच भावस्पर्शी लेख आहे

    उत्तर द्याहटवा
  4. *भरत सर, तुमचे सर्वच लेख ,कविता व इतर साहित्य खुपच सुंदर असतात--- पण आजची कथा खुपच हृदय स्पर्शी होती. बऱ्याच दिवसांनी खुप छान वाचायला मिळाले-- खुप खुप अभिनंदन व खुप साऱ्या शुभेच्छा आपल्या हातून अशीच सेवा घडो -- धन्यवाद सर*

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.

माझी लीव्ह व्हॅकन्सी..