कारगिल, हिमनगाचे एक टोक



कारगिल, हिमनगाचे एक टोक

कारगिल युद्ध भारत व पाकिस्तान दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात झालेले मर्यादित युद्ध होते.  यात युद्धरुपी हिमनगाचे टोक काश्मिर मध्ये व्यक्त झाले होते.  त्या वेळी दिस­­लेल्या त्या हिमनगाचा जलमग्न भाग चीनी युद्धज्वारपासून नेपाळी कागाळ्या आणि पाकिस्तानच्या सततच्या आगळीकीतून दिसून येतो. याचा विस्तार मोठा आहे.


२६ जुलै.  कारगील विजय दिवस.  पाकिस्तानी षडयंत्राने रचलेला डाव भारतीय विरांनी उधळला, ती ही तारीख.  ही बाब फक्त एवढीच नाही.  त्या युद्धाच्या पोटात धुमसणारे अनेक घटक आहेत.  १९९९ च्या कारगील युद्धाच्या आधी १९८५ साली जणू याची रंगीत तालीमच झाली होती.  त्यावेळीही व नंतर झालेल्या युद्धाने देशाला चांगलेच झुंजवले होते.  आता ड्रॅगनची समस्या सीमेवर नेहमीप्रमाणेच डोके वर काढून बसली आहे. एकूणच काय तर कारगील हे एक हिमनगाचे टोक होते.  दहशतवाद, भारताचा विकास रोखण्यासाठी प्रयत्नशील तथाकथित सभ्य शक्तींचे अदृश्य हात, पाकिस्तानचा भारत द्वेष आणि चीनची दुष्ट बुद्धी, भारतात राहून विदेशी हातांना मजबूत करण्याचे मनसुबे असलेल्यांचाही ताना-बाणा या हिमनगाच्या न दिसणाऱ्या जलमग्न भागातील आव्हान आहे.


      १९८५ मध्ये हिवाळ्यात सियाचीन मधील बिला फोंडलापास पासून दीड मैलावरील कैद पोस्ट हे साडेबावीस हजार फूट उंचीवरील हिमशिखर पाकिस्तानी सैन्याने असेच ताब्यात घेतले होते.  कारगिल सारखेच भारतीय सेना पथके त्यावेळीही खाली आली होती.  पाकच्या कमांडोजनी ब्रिगेडीयर मोहंमद अझीज या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्या पोस्ट वर ताबा मिळविला होता.  ते ठिकाण परत मिळविण्यासाठी भारताला सतत एक वर्ष संघर्ष करावा लागला होता.  त्यानंतर कारगीलचा संघर्ष देशासमोर आहेच.  ही युद्धे आपल्याच भूमीवर केवळ आपलीच भूमी सोडविण्यापुरती लढली गेली.  सर्जीलक स्ट्रईक करतानाही पाकिस्तानी भूमीचा ताबा घेण्याचे भारतीय धोरण नव्हते.


      पाकिस्तानने भारताशी धरलेल्या शत्रुत्वात भारत हा पाकिस्तानसाठी दिलदार शत्रु आहे.  तर सहनशीलतेची पराकाष्ठा झालेल्या भारतासाठी पाकिस्तान व चीन हे कपटी शेजारी आहेत.  भारताचा भूभाग देऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर व्याप्त काश्मीर ताब्यात ठेऊन, अक्साई भारत चीनने घशात घालूनही समाधान न झालेल्यांनी भारताचे लचके तोडण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.  हा या जलमग्न हिमनगातील सर्वात उपद्रवी भाग ठरत आहेत.  सरकारच्या धडक कारवायांनी अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले असले तरी काश्मिरात दहशतवाद निर्यातीच्या पाकिस्तानी धोरणाचा बिमोड झालेला नाही.  आजही पाकिस्तानची भारतात दहशतवाद निर्यात सुरूच आहे तर भारत या ही स्थितीत जीवरक्षक औषधांची पाकिस्तानला निर्यात करत आहे.


कारगील मध्ये त्यावेळी उदभवलेले हिमनगाचे टोक भारताने फोडून काढले.   परंतु जेंव्हा जलमग्न हिमनग फोडून खंड – खंड विखुरला जाईल तेंव्हाच भारताला स्वस्थ्य लाभेल असे चित्र आहे.  कारगील विजय दिन साजरा करताना सरकार, सैन्य आणि गुप्तचर संस्थांनाच नव्हे तर देशवासियांना देशविरोधी कारवायांचा हा भाग फोडण्यासाठी सज्ज रहावे लागेल.  पाठीवर बंदुक घेऊन शेती करणाऱ्या इस्त्रायलींची मानसिकता भारतीयांना शत्रुचा बिमोड करण्यासाठी तयारी करावी लागेल.  प्रत्यक्ष बंदुकच घेतली पाहिजे असे नाही, परंतु पूरक राष्ट्रीय भावना व कर्तव्य निर्मिती आणि नव्या पिढीची तयारी काळाची गरज आहे.  आता लष्करात ऐच्छिक सेवा देता याईल हे धोरण त्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.  कपटी शेजाऱ्यांच्या घातकी धोरणांमुळे बदलत्या स्थितीत प्रत्येक घर सैनिकाचे असावे ही देशाची हाक आहे. 


      सोईनुसार गट आणि पाठराखण बदलणारी विकसीत राष्ट्रे, शस्रास्त्रांचे दुकानदार आणि विविध आजारांचे प्रसारक आहेत. त्यांच्यासाठी जगातील दुबळी राष्ट्रे म्हणजे फक्त बाजारपेठ आणि शस्त्रे व विषाणुंच्या प्रयोगाचे गिनिपीग आहेत.  दहशतवादी आणि सनदशीर सरकारांनाही मरण्या-मारण्याची साधने व प्रायोगिक औषधे विकून ते गल्ला भरत आहेत. त्यांच्यासाठी दहशतवादग्रस्त भाग म्हणजे नव्या शस्त्रांची चाचणी आणि शक्तीप्रदर्शन करण्याचे मैदनच.  त्यात शहरे बेचिराख झाली, माणसे मारली गेली आणि परागंदा झाली.  यातून दहशतवादाचा कायमचा बिमोड तर झालाच नाही, तात्पुरता तोडगाही निघाला नाही.  उलट अशी प्रवृत्ती चीन सारख्या देशाचा उर्मटपणा बनली.  तेंव्हा तिथपर्यंत मानवी द्रोहाचा हा हिमनग कसे काम करतो ते दिसून येते. अर्थात कारगीलमध्ये घुसून भ्याडपणे दहशतवाद्यांसारखे वर्तन करणाऱ्या पाकिस्तानी सैनाचे आणि जगभरात दहशतवादाने ग्रस्त भागातील दहशतवाद्यांचे वर्तन सारखेच.  या सर्व विषयाचा विचार करता भारताला आत्मनिर्भरते वाचून पर्याय नाही हेच अधोरेखीत होते.


      कारगील युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची घोषणाच झाली नाही.  यात पाकिस्तानने आपले सैनिक नसल्याचे आधी घोषीत केले व नंतर ते जाहीरपणे स्वीकारलेही.  दरम्यान पाकिस्तानसाठी ज्या जवानांनी देह ठेवला त्यांना मात्र त्यांच्याच देशाने सन्मान दिला नाही.  तशीच मानसिकता नुकतेच चीन बरोबर झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या चीनी जवानांना सन्मान न देता चीनने दाखविली.  ही राष्ट्रे मुळात अमानवीय प्रवृत्ती आहेत.  ते इतरांच्या मानवी मूल्यांवर सतत अतिक्रमण व आक्रमण करत आली आहेत. 


      कारगिल घुसखोरीत भारताच्या दाव्यानुसार पाकिस्तानने १३० ते २०० चौरस कि.मी.चा प्रदेश ताब्यात घेतला होता.  तर पाकच्या षडयंत्रकर्त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी १३०० चौ.कि.मी. वर ताबा मिळविला होता.  घुसखोरांनी आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा  विमानभेदी क्षेपणास्त्रे अशी त्यांची तयारी होती. तसेच, चौक्यांचा सभोवतालचा परिसर भूसुरूंगांनी संरक्षित केला होता. यातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले.  ही चढाई करण्यासाठी पाकिस्तानने आधी मानवरहीत विमानांद्वारे टेहळणी केली होती.  ताब्यातील चौक्यांना पाकिस्तानी भागातून तोफांचे संरक्षण होते. त्यांची तयारी भक्कम होती.  श्रीनगर – लेह मार्गावर नियंत्रण मिळवत सियाचीन भारतापासून तोडण्याचा त्यांचा मनसुबा होता. 


भारताने ऑपरेशन विजय या नावाने येथे कारवाई केली.  भारतीय वायुदलाने, ऑपरेशन सफेद सागर सुरू केले.  भारताला आपली दोन मिग विमानं आणि हेलिकॉप्टर गमवावं लागलं. नौदलानेही पाकिस्तानी जहाजांची कोंडी केली.  कराची बंदरासह इतर बंदरांना लक्ष केले.  येथील भौगोलिक स्थितामुळे दोन लाख इतक्या सैन्य बलाचा आधार भारताने घेतला असला तरी प्रत्यक्षात अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने ३०,००० पर्यंत सैन्यबल या युद्धात प्रत्यक्ष वापरले.  पाकिस्तानी सूत्रांच्या दाव्यानुसार घुसखोरांची संख्या ५,००० होती.  सैन्य बलाचा अनुपात निश्चितच विचार करायाला लावणारा असला तरी पाकिस्तानी सैन्याने युद्धभूमीवर मिळविलेली स्थिती (पोझीशन) उंचावर तर भारतीय सैन्य तुलनेत खाली व त्यांच्या मारक टप्प्यात होते.  जगातील सर्वाधीक उंचीवरील या रणभूमीवर झालेले हे युद्ध भौगिलिक कारणांनी सैन्यबलाचा अनुपात विचित्र करणारे होते.  साधारणपणे जमिनीवरील युद्धात हल्ला करणारं सैन्य बचाव करणाऱ्या सैन्याच्या किमान तिप्पट असावं लागतं. डोंगराळ प्रदेशात किमान नऊपट आणि कारगिलसारख्या भागामध्ये सत्तावीस पट.  जर शत्रूचा एक जवान तिथे वर बसलेला असेल तर त्याला हटवण्यासाठी २७ जवान पाठवावे लागतील.


        या युद्धात भारतीय सैन्याने काही लढायांमध्ये रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळ कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणांवरुन हल्ले चढवले व चौक्या ताब्यात घेतल्या. काही ठिकाणी भारतीय सैन्यातील काही मुसलमान तुकड्यांनी आक्रमण करताना अल्ला हू अकबर असा नारा देत हल्ला केला.  त्यामुळे शत्रूपक्ष आपलेच सैनिक आहेत या भ्रमात राहिले व चौक्या गमवाव्या लागल्या.  उंच चौक्या, दगडी व रेताड भागामुळे लपायची फारशी जागा उपलब्ध नव्हती.  भारतीय सैन्याने मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून बहुतेक हालचाल रात्रीच्या वेळेसच करण्याचे धोरण आखले होते. रात्रीच्या हालचाली वेळखाऊ होत्या.  अतिशय कमी तापमान व जबरदस्त उतारावरील लढाया अशा सर्वच गोष्टी भारताच्या विरोधात होत्या.  सर्व चौक्यांना वेढा देऊन रसद तोडून कमी जोखमीचे चे युद्ध करणे भारताला शक्य होते.  हवाई हल्ले चढवून चौक्या मिळवणेही शक्य होते. परंतु या साठी भारताला नियंत्रण रेषेपलीकडचा भाग मिळवणे आवश्यक होते.  तसे केल्यास पूर्ण युद्धाची शक्यता होती.  भारत सरकार यासाठी तयार नव्हते.  त्यामुळे युद्धात मिळालेली आंतरराष्ट्रीय सहानुभूती गमावण्याची भीती होती.  तोलोलिंग व टायगर हिलची लढाई या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते.  अनेक शूर भारतीय अधिकारी व सैनिक या लढायांमध्ये शहीद झाले.  तोलोलिंगच्या लढाईनंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले.  टायगर हिलवर उशीरा नियंत्रण मिळवले गेले तरी ती सर्वात महत्त्वाची लढाई होती. 


हे युद्ध ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक शहीद झाले. १३६३ जखमी झाले. तर २७०० पाकिस्तानी सैनिक मरण पावले  युद्ध थांबवण्यासाठी नवाज शरीफ यांना अमेरिकेचे पाय धरावे लागले.  बोफोर्ससहित ३०० तोफांचा वापर झाला. अडीच लाख तोफगोळे, बॉंब आणि रॉकेट्स डागले. रोज ३०० तोफांमधून ५००० गोळे, मॉर्टर, बॉंब आणि रॉकेटस् डागले जात होते. एकट्या टायगर हिलवर ताबा मिळविण्यासाठी ९,००० तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य ४० वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी १८ तोफा २५ दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले.  शत्रूचे ८०% सैनिक मारले गेले.  लढाईआधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकॉप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.


या युद्धाची सुरूवात झाली तेंव्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी फोन करून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची कानउघडणी केली होती.  परंतु पाकिस्तानी सैनिक तिथे लढत असल्याचे शरीफ यांनी माहीत नसल्याचे सांगीतले.  याच फोनवरून जेष्ठ चित्रपटक कलावंत दिलीप कुमार यांनी शरीफ यांच्याकडे निषेध नोंदवला होता.


एका शूर पाकिस्तानी अधिकाऱ्याचे पार्थीव भारताने सन्मानाने पाकिस्तानच्या ताब्यात देत त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना सन्मानित करण्याचे सुचविले होते.  त्यानुसार पाकिस्तानने त्यांच्या त्या अधिकाऱ्याला पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी किताब बहाल केला होता.  अशा प्रकारे भारताने शत्रुराष्ट्राच्या अधिकाऱ्याला त्याच्या हक्काचा गौरव मिळवून दिला होता.


                                                                                                            -भरत वेदपाठक

 


संदर्भ – विकिपिडिया व विविध दैनिकातील लेख.

 

 

 

       

 


टिप्पण्या

  1. खूप सुंदर लेख. यामुळे कारगिल व जम्मू काश्मीर मधील परिस्थिती किती भयंकर आहे याचा अंदाज येतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले देश सेवा करत आहे. भारतीय सैन्याला शतशः नमन

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर योग्य वर्णन सध्याच्या परिस्थितीचे केले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद , परिस्थिती आहेखूप गंभीर आहे हिमनगाचे टोक आहे हे अगदी बरोबर आहे, कारवाई करून पाकिस्तानचा बीमोड करावा आत्ताची ही योग्य वेळ आहे चिनआपला मित्र कधीच नव्हता आणि भविष्यात पण नसणार आहे

    उत्तर द्याहटवा
  3. .पू.
    अतिशय सुंदर योग्य वर्णन सध्याच्या परिस्थितीचे केले आहे त्याबद्दल आपले धन्यवाद , परिस्थिती आहेखूप गंभीर आहे हिमनगाचे टोक आहे हे अगदी बरोबर आहे, कारवाई करून पाकिस्तानचा बीमोड करावा आत्ताची ही योग्य वेळ आहे चिनआपला मित्र कधीच नव्हता आणि भविष्यात पण नसणार आहे संजयसिंह फाळके

    उत्तर द्याहटवा
  4. कारगिल विजय दिनानिमित्त लिहिलेला प्राध्यापक भरत वेदपाठक यांनी उत्कृष्ट लेख लिहिलेला असून युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे सर आपल्याकडून सातत्याने अशा प्रकारचे लिखाण व्हावे ही अपेक्षा
    जय हिंद
    मेजर संजय चौधरी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.

माझी लीव्ह व्हॅकन्सी..