पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे
आण्णा भाऊ साठे (मूळ नाव तुकाराम.)
(१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ )
वडिलांचे नाव - भाऊ सिधोजी साठे, आईचे नाव - वालबाई होते. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली).
ज्यांची हातवरची पोटं असतात, ते जगाचे पोट भरत असतात. त्यांच्या कष्टातूनच इतरांच्या जगण्याची साधन-सामुग्री तयार होत असते. त्यात सर्व क्षेत्रातील कष्टकरींचा समावेश होतो. चीनी व्हायरसने जग स्तब्ध झाले आणि हातावरची पोटं असणारा वर्ग हवालदिल झाला. कारखान्यांची चाकं थांबली. उलाढाल ठप्प झाली. आधीच संकटं तशात कोरोनाच्या हल्ल्याच्या निर्बंधांमुळे परतणाऱ्या प्रवासी मजुरांचे लोंढे रस्त्यावर दिसू लागले. ही स्थिती फक्त भारतातच होती असे नाही तर जगभर हेच चित्र होते. ज्यांच्या हातांवर पृथ्वी तरलेली आहे तो हा श्रमजीवी वर्ग. आज आण्णा भाऊ साठेंचा स्मृतीदिन. आण्णां भाऊंनी सांगीतलेल्या या वर्गाचे हात पुन्हा आपापल्या कामांना लागल्याशिवाय पृथ्वीचे अर्थचक्र फिरणार नाही. प्रगत देशांमध्ये रोबोट असतील, पण तिथेही श्रमजीवींचे स्वरूप बदललेले असेल. दरम्यान जगाच्या धनावर बसण्याचे स्वप्न पाहणारा चीनी 'नागोबा' पृथ्वीला आपल्या अहंकाराच्या फनावर तोलण्याचे स्वप्न पाहत आहे. संभाव्य युद्धातून स्वप्ने बेचिराख होतील ती पुन्हा उभारण्यासाठी पुन्हा पृथ्वी हातावर तोलणारा वर्गच लागेल. कोरोनानंतरच्या जगातही हाच वर्ग डळमळू लागलेल्या पृथ्वीला तोलून धरणार आहे.
कष्टकऱ्यांचा कैवार आण्णां भाऊंनी ज्या शब्दात मांडला होता त्या पेक्षा अधिक समर्पक शब्द इतरांच्या लेखनीत सापडले नाहीत. कारण आण्णां भाऊंनी स्वतः या सर्व व्यथा वेदना सहन केल्या होत्या. या शब्दश्रीमंत माणसाने चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे केली. बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात काम केले. तिथे लोककलेचा बाज अवगत केला आणि तमाशाच्या पारंपारिक स्वरूपातमध्ये काही बदल करून ते समकालीन परिस्थितीशी मिळतेजुळते केले. त्यात शृंगाराचा प्रभाव कमी करून वीर रस ओतला. आपल्या सादरी करणाच्या सामर्थ्याने तमाशाच्या चाहत्या वर्गात वर्गीय क्रांतीचे चैतन्य निर्माण केले. ही बाब तशी नवीनच असली तरी आपल्याच प्रश्नांना हात घालणारा हा मुद्दा तमाशा रसीकांचे प्रबोधन करणारा ठरत होता. याद्वारे आण्णां भाऊंनी या वर्गाचे मानसीक संघटन सुरू केले होते.
कोळी, भिल्ल, रामोशी, आदिवासी, मांग, महार आदी समाजावर बेतलेले वघनाट्य, कथा व कादंबऱ्या रसीकांना खिळवून ठेवत व नंतरही त्याचे चिंतन करायला भाग पाडत. यातून अन्याविरूद्ध बंड मनामनात पेरले गेले. काल्पनिक आदर्शवादाचा मनोरंजनात्मक बाज सोडून यथार्थवादी साहित्य आणि सादरीकरण जनमनाचा ठाव घेत राहिले. मनोरंजनासाठी कपोलकल्पीत कथा, काव्य आणि शृंगार तात्कालीक भुरळ घालतो. परंतु आण्णाभाऊंनी समाजाच्या व्याथा-वेदनांची नस पकडून प्रत्येकाला स्वतःच स्वतःचे परीक्षण व परिस्थितीचे निरीक्षण करण्यास भाग पाडले. ज्वलंत विषयांवर त्यांची लेखणी आजही मनाचा ठाव घेते. समाजबांधवांना सातत्याने गावकुसाबाहेर ठेवले गेले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली गेली. जनावरांच्याही वाट्याला येत नव्हती अशी कष्टाची कामे लादली, मात्र मोबदला दिला नाही. प्राणांतीक कष्टाने जगणारा वर्ग, आपला जन्मच यासाठी आहे ही समजूत घेऊनच जगत-वागत होता. वर्ण व्यवस्थेतील तथाकथित श्रेष्ठांचा जन्म म्हणजे देवाने त्यांना दिलेला आशिर्वाद आहे अशा समजुती खोलवर रूजवून ही जन्मावरची जखम आहे असे न मानता वेदना सहन करत जगणे हेच आपले कर्तव्य आहे अशी पक्की धारणा असलेला वर्ग जागा करण्याचे काम आण्णांनी केले. यामध्येच त्यांच्या जळजळीत वाक्याचा गाभा होता, "पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे."
लहानपणी जेंव्हा त्यांच्या परिसरात कुठे काही गुन्हा झाला की वस्तीत पोलीस येत. जमेल त्याची धरपकड करत. त्यावेळी वस्तीवरील सगळी माणसं-महिला लगतच्या डोंगरात लपत. खाण्यापिण्याचे वांदे व्हायचेच. खालच्या जातीचा म्हणून कोणापुढे जायचे नाही. जातीभेदाच्या चटक्यांनी व्यथित लहाणग्या तुकारामाने (आण्णां भाऊंनी) मुंबईत राहणाऱ्या आपल्या वडिलांना विचारले की, "मुंबईत अशीच स्थिती आहे का?" त्यावर ते म्हणाले, "व्हय. तिथंपण असंचंय. हॉटेल मालकांनी फुटक्या कपबशा बाहीर ठिवल्यात. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर बसून च्या पेत्यात. रिवाज म्हणून आम्ही पण बाहेर बसून च्या पितो. पण इंग्रज सायबाकडं आसं नाय. त्यांच्याकडं माळी काम करताना सायेब त्यांच्याच कपातून च्या देतो. त्यांच्याकडे एकच माणसाची जात. आपली माणसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आपल्यावर राज्य करत्याती. आन् आमी एका देशाचं असून एकमेकाला शिवून घेत नाय.."
मुंबईत शिक्षणाचे महत्व तुकारामाच्या वडिलांना पटले होते. तुकारामाने शिकावे असे मनोमन वाटत होते. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी तुकारामाला शाळेत धाडले. तिथे पक्षपाती शिक्षकाने तुकारामाला पहिल्याच दिवशी हाताची बोटे सुजे पर्यंत मारले. धसका घेतलेल्या तुकारामाची शाळा दुसऱ्या दिवसापासून कायमची सुटली. अशी दीड दिवसांची शाळा करून त्यांनी स्वबळावर अक्षरज्ञान मिळविले. ते इतके पक्के होते की त्यातून इतिहास घडला. मुंबईत परतताच त्यांना मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली.
१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा गावी आले. १९४२ च्या स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर वॉरण्ट काढले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पोवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. मुंबई सरकारने यावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णां भाऊंनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर केले. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. १९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. 'लोकयुद्ध' साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी, 'अकलेची गोष्ट', 'खापर्या चोर', 'माझी मुंबई' अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णां भाऊंचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली.
‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. 'अकलेची गोष्ट'(१९४५), 'देशभक्त घोटाळे'(१९४६), 'शेटजींचे इलेक्शन'(१९४६), 'बेकायदेशीर'(१९४७), 'पुढारी मिळाला'(१९५२), 'लोकमंत्र्यांचा दौरा'(१९५२) ही त्यांची काही लोकनाट्य होत. त्यांनी सुमारे १५ वगनाट्ये लिहली. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. ‘जिवंत काडतूस’, ‘आबी’, ‘खुळंवाडी’, ‘बरबाद्या कंजारी’(१९६०), ‘चिरानगरची भुतं’(१९७८ ), ‘कृष्णाकाठच्या कथा’ हे त्यांचे काही कथासंग्रह. त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. ‘चित्रा’(१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांत ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे. ‘वारणेचा वाघ’(१९६८), ‘चिखलातील कमळ’, ‘रानगंगा’, ‘माकडीचा माळ’(१९६३), ‘वैजयंता’ यासारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो.
त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले - वैजयंता (१९६१,कादंबरी – वैजयंता), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९,कादंबरी – आवडी ), डोंगरची मैना (१९६९,कादंबरी – माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९,कादंबरी – चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०,कादंबरी –वारणेचा वाघ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४,कादंबरी – अलगूज), फकिरा (कादंबरी – फकिरा ). या शिवाय इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. त्यांचे हे सर्व साहित्य चिरागनगरच्या झोपडपट्टीत निर्माण झाले. याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. डफ, बुलबुल, बासरी, हार्मोनियम, सारंगी अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमान पात्रातून अनेक लेख व पुस्तकांची परीक्षणे लिहिली.
त्यांनी वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, “जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहत पाहत मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य हृदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकवर नसून ती दलीतांच्या, शोषितांच्या कामगारांच्या तळहातावर तरली आहे. त्या शोषितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने व निष्ठेने मी चित्रित करणार आहे आणि करत आहे.
कष्टकऱ्याच्या हाताचे महत्व आण्णांनी २ मार्च १९५८ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनात पुन्हा स्पष्ट केले होते. या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. येथील भाषणात त्यांनी पृथ्वी तारणाऱ्या हातांचा गौरव केला होता. ते म्हणाले, माणूस जगतो का ? जगण्यासाठी एवढा धडपडतो का ? याचा विचार आम्ही करणे आवश्यक आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो. तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो. खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मारण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाहीतर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे... दलितातही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामांसाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो...”
“एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जागविणारा हा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. कुटुंबसंस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो. परंतु त्याची कुटुंबसंस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारणपरंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्याविषयी लिहावे. जपून लिहावे, कारण या समाजाची घडीन् घडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे". अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकारामांचे म्हणणे खोटे नाही. म्हणून दलिताविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस , हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनतेबरोबर असतो त्याच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील श्रेष्ठ कलावंतांनी वाङ्गमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे. तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे आवश्यक आहे. हा असा तिसरा डोळा देणाऱ्या अण्णा भाऊंचा शेवटचा काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठानकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. विपन्नावस्थेत गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्याचं निधन झाले.
- भरत वेदपाठक
Va vvah sir. Apratim lekh aahe.
उत्तर द्याहटवाभरत तुझ्याकडून असाच झंजावात अपेक्षित होता
उत्तर द्याहटवाआपले लिखाण खूप छान आहे आपण लिखाण करुन समाजाकरता व राष्ट्र करता सतत कार्य करत राहावे ही अपेक्षा जय हिं
उत्तर द्याहटवाGreat , Bharat sir.
उत्तर द्याहटवाअप्रतीम लेख भरतजी .....
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद सर,
उत्तर द्याहटवाखरं तर मी अभिनंदन करायला हवे होते, परंतु सर तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून का होईना, लेखन सुरु केले, यातच समाधान आहे.
आतिशय सुंदर व अप्रतिम लेख ! पुढील लिखाना स शुभेच्छा !
हटवाज्यांची अननोन अशी नोंद होत आहे त्यांनी कृपया आपल्या प्रतिक्रियेत आपले नाव लिहावे ही विनंती
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर भाऊ
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट लेखन केलेल आहे
उत्तर द्याहटवातत्कालीन समाजाच्या वेदना दुर्दशा हे आपल्या लेखणीतून अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे त्याची नवीन पिढीला नक्कीच जाणीव होईल व सद्यस्थितीमध्ये आपली काय जबाबदारी आहे याचं भानही नवीन पिढीला आल्याशिवाय राहणार नाही लेखाबद्दल धन्यवाद अभिनंदन ही.
*प्रा. मिनेश जगधने*
>दीड दिवसांची शाळा करून त्यांनी स्वबळावर अक्षरज्ञान मिळविले. ते इतके पक्के होते की त्यातून इतिहास घडला.<
उत्तर द्याहटवाअण्णा भाऊ ह्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, सुंदर सलामी दिली.
khidaki.blogspot.com
खुपच सुंदर लेख --- आपण आज ब्लॉक च्या माध्यमातून प्रसिध्द केला व असंख्य वाचक यांच्या पसंतीस उतरेल यात तीळमात्र शंका नाही --- खुप खुप शुभेच्छा सर
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद भरतजी,
उत्तर द्याहटवाविश्वभुषण विश्व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण आपला ब्लॉग सुरु केला आहे त्याबद्दल अभिनंदन!
आदरणीय अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपण प्रकाशझोत टाकलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
धन्यवाद,
आपला मित्र,
सागर रंधवे.
अनेक मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी ब्लॉग सुरू केल्याबद्दल व तो ही आण्णा भाऊंच्या स्मृतीस अर्पण करून सुरू केल्या बद्दल माझे अभिनंदन केले. तर आदरणीय सतीष कुलकर्णी सरांनी महत्वाचे मार्गदर्शनही केले. असा ब्लॉग सुरू करण्याबद्दल माझे मित्र मला अनेक दिवसांपासून बोलत होते. त्यात प्रामुख्याने स्वप्निल देसाई, सचिन पोटरे, रामदास हजारे, सचिन गुरव अशा मित्रांनी तर पाठपुरावाच केला होता. आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. या उपक्रमाला आपले सहकार्य व मार्गदर्शन निरंतर राहो. प्रासंगीक व इतर लेख याद्वारे देण्याचा माझा प्रयत्न राहील. कृपया ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या सर्वांना विनंती, आपले नाव त्यात येणार नसेल तर स्वतंत्र उल्लेख करावा. प्रतिक्रिया नोंदविणाराचे नाव मला समजू शकेल.
उत्तर द्याहटवा#ब्लॉग सर्वदूर पोचविण्यासाठी माझे मित्र चंद्रकांत काळोखे यांनी खूप मोठे सहकार्य केले. प्रचंड नेटवर्क असलेल्या चंदुभाऊंनी एकाच दिवसात राज्यभर आणि तीन देशात वाचकांपर्यंत हा ब्लॉग पोचवला. आपल्यासारख्या मित्रांचे प्रेम हा माझा अनमोल खजीना आहे.
सदैव आपलाच,
भरत वेदपाठक, औरंगाबाद