अधीन व्हावे की ठेवावे

 



    यथार्थ आणि आदर्श यांमधे जमीन आणि आसमान इतके अंतर असते.  आदर्शाच्या शोधाचे बेगडीपण पांघरुण यथार्थाच्या अस्तित्त्वाकडे डोळेझाक करणे ही व्यापक समाजाची सवय असते.  राजकारण्यांना लोकांच्या नासमज असण्याच्या तुलनेत समजुतदार असण्याची भिती जास्त असते.  कारण समजदार लोकं, राजकारणी काय बोलतात याबरोबरच ते का बोलतात याचा विचार करतात.  त्यांना परिणामांची जाणवी होते.  अशा वेळी समजदारांकडून राजकारण्यांचे हेतू साध्य होत नाहीत.  परंतु समजदार एक तर राजकारण्यांच्या हेतुपुरस्सर बोलण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा मौन राहतात.  जे समजासाठी घतक ठरतं किंवा राजकारण्यांच्या हेतुविषयी असं काही बोलतात जे की राजरकारण्यांसाठी घतक ठरतं. 

व्यक्त होणाऱ्या समजदारांवर, ‘नकारात्मक विचारांचे लोकं’ असा ठसा उमटवण्याचे गोबेल नीतीचे प्रकार होतात.  यासाठी नासमज लोकांचा पुरेपूर वापर करून खरं सांगणारांना वाळीत, वेगळं, नको असलेले असं काहीसं ठरविण्याचे प्रयत्न होतात.  पण वेगळं काही करण्यासाठी थोडासा तरी धोका पत्करावा लागतो.  जर सुरक्षीत वातावरणातच राहून आपली प्रगती होईल असं वाटत असेल तर ते चुकीचं ठरतं.  पण या विपरित जाण्यासाठी काही किंमत मोजायची तयारी ठेवावी लागते.  किंमत मोजताना भान असेल तर माणूस बेभान होत नाही. 

     ऐतिहासीक स्पष्टता ही सर्वात मोठी ताकद असते.  या स्पष्टतेचा उपयोग ऐक्य निर्माण व सामाजिक सौहार्द निर्मितीसाठी होतो.  एकदा तुम्हाला माहीत असलं की तुम्ही कोण आणि कसे आहात की मग तुम्ही संभ्रमित नसता.  मात्र असे संभ्रम निर्माण करणं ही एक कुटीलता आहे.  या कुटीलतेचा वापर सत्तेवर सातत्याने वर्चस्व मिळविणे, ते तसेच राखणे यासाठी केला जातो. 

ऐतिहासीक तथ्याचे चित्र सत्य नसेल तर ते तथ्य नसून मीथक असते.  अशा मीथकातून सत्याचा आभास निर्माण केला की आभासाव्यतिरिक्तचे किंवा त्या मागचे सत्य काय आहे हे आपल्या वर्तुळाव्यतिरिक्त कोणाला समजू नये, त्याचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्न करु नये म्हणून आभास निर्माण करणारी व्यवस्था घाबरलेली असते.  अशा व्यवस्थेला या आभासातून स्वतःसाठी स्वतःला हवे तसेच नवे अवकाश निर्माण करायचे असते ज्यावर त्यांचे वर्चस्व असावे अशी या आभासाची रचना असते.  यासाठी मोठ्या खुबीने इतिहासाचा शस्त्रासारखा वापर केला जातो.  मग हे शस्त्र वापरणारांची तोंडे इतिहासाचे सत्य उध्वस्त करणाऱ्या तोफा बनतात.  त्यांचे शब्द म्हणजे दूरगामी कुटील परिणाम साधणारे तोफगोळेच असतात.  अशा ‘तोफा’ प्रत्येक युगात सक्रीय असतात.  पण सध्या त्यांची संख्या इतकी वाढली आहे की त्या घरोघर लामबंद झाल्यात आणि शक्य तेवढे विषारी व घातक शब्दगोळे’ बाळगून आहेत.    

     मग कपोलकल्पीत कथा प्रसृत करणारे सतत या भितीने ग्रासलेले असतात की समोरच्या व्यक्तीकडून सत्य पुराव्यानिशी समोर येऊ नये.  यासाठी मग असत्याची मालिकाच सुरु होते आणि मालिकेचे वाहक वाढविणे म्हणजे आपले असत्य रक्षित करणे होय.  यासाठी शाळा-महाविद्यालये, वर्तमानपत्रे, वृत्तवाहीन्या यासह ज्ञान वर्धनाची व संवर्धनाची साधने सुद्धा मीथकांनीच रंगविली जातात. 

पहिल्या दिवसापासूनच असत्याच्या आधारावर इमारत बांधायला सुरुवात केली तर इमारतीत राहण्यासाठी येणारेही त्याच असत्याच्या वातावरणात वाढतात.  अशी इमारत बांधणारांना ते तसेच वाढवायचे असतात.  यासाठी इतिहासाला बाजूला सारुन आपल्या मनपसंत कुटील हेतूला पूरक कथा जोपासायची असते.  एकदा खोटं बोललं की मग त्याला पूरक अशा अनेक प्रकारच्या असत्याच्या छत्र्या तयार कराव्या लागतात.  मग सत्याचा पाऊस किंवा ऊन छत्री खाली जाऊ नये असा हा प्रयत्न असतो.  मात्र कधीतरी सत्य वादळी स्वरुपात येतं आणि अशा छत्र्या उडून जातात.  त्यावेळी मात्र छत्रीखाली आजवर मनात जोपासलेलं असत्य आणि वादळी सत्य याच्यामधे छत्रीखालच्या समाजाचं द्वंद्व सुरु होतं.  तो मंथन काळ असतो. 

पण आपण आपली ऐतिहासीक चूक दुरुस्त केली पाहीजे.  मान्य केलं पाहीजे की इतिहासात काय चूक झाली होती.  मग मनातील सततची असुरक्षीततेची भावना दूर होते.  हे होणं हे कोणत्याही देशाच्या, समाजाच्या हिताचं असतं.  अन्यथा दरम्यान सातत्याने असुरक्षीततेत समाज वावरत असतो आणि त्यात एक सातत्यापूर्ण संघर्ष सुरु असतो.  परंतु केवळ या जाणीवेने कार्यभाग साध्य होणार नाही, त्यासाठी इतिहासातील रक्तरंजित आणि विभंजित संदर्भांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.  सत्य समोर पुराव्यानिशी येऊनही ते न स्वीकारणारे घटक जर असतील तर त्यांचा बंदोबस्त करावा लागतो.  अन्यथा सत्याच्या साकार होण्याने शांतता आकार घेईलच याची खात्री नसते. 

ज्यांचे हेतू असत्याच्या पायवर उभे असतात तो पाया उध्वस्त होऊ लागला की असे पाया रचणारे अधिक आक्रमक होतात.  कारण आपल्या चुकीच्या संकल्पनेचा पाया रचणारे तुलनेत वैचारिक कमकुवत व कुटील असतात.  त्यांच्यात सत्याचा आधार घेऊन आपली संकल्पना साकार करण्याची क्षमता नसते.  असे कमकुवत अधिक क्रूर बनतात.  कारण क्रोर्य हे त्यांना त्यांच्या विचारांच्या प्रसाराचे प्रमुख साधन वाटते.  खरे तर शक्तीसंपन्नांमध्ये नव्हे तर दुबळ्यांमध्ये क्रौर्य अधिक असते.  अर्थात शक्तीसंपन्नता तुमच्या ऐतिहासिक वारशांची, सांस्कृतिक भक्कमतेची, वैचारिक पार्श्वभूमिची, सरुपतेच्या रसग्रहणाची, बदल हा निसर्गाचा नियम असतो या जाणीवेची अशी एका वेळी अनेक बाबींची असते. 

संविधानातून सामाजिक व्यवस्थेच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे.  तशी तरतूद असूनही हीतसंरक्षण होत नसेल तर अनागोंदी जन्माला येते.  रस्त्यावर उतरणे, आंदोलने करणे, जाळपोळ करणे, दंगली घडविणे यातून एखाद्या घटकाला आपल्या मागण्या मान्य करण्याकडे लक्ष वेधावे लागत असेल तर ते अपयश संविधानाचे नाही त्याची अंमलबजावणी कोणाच्या नियंत्रणात आहे त्यांचे आहे.  पण जसे अंमलदार चुकतात तसे झुंडशाहीने कोणी संविधानाला धक्का पोचवू पाहत असेल तर दोघांचाही बंदोबस्त झाला पाहिजे.

सावरणारे व्यक्तिमत्त्व चांगले असेल तर रसातळाला गेलेला देशही पुन्हा नवी झेप नवी उभारी घेऊ शकतो.  हे कुठेही घडू शकते.  तसेच व्यक्तीमत्त्वे येऊन देशाच्या संरचनेला नष्ट करु शकत नसतात.  व्यक्ती येते आणि जाते.  देश आपल्या जागेवर असतो.  मात्र असे व्यक्तीमत्त्व चुकीचे असले की देशाला त्याची किंमत निश्चितच मोजावी लागते. 

सामाजिक मानसिकतेची जडणघडण करण्याची साधनेच जर चुकीच्या हातात असतील तर समाज अंध बनतो हे निश्चित.  अंधपणे वाटचाल करणारे कुठे तरी धडकणार, अडकणार, कुणाच्यातरी जाळ्यात नकळत सापडणार हे ही निश्चित.  सर्वात प्रथम समाजाची जैवरचना येते, जी निर्दोष असावी लागते.  त्यातून मनोकायीक रचाना घडते आणि त्यातून मग समाजविशेषाचे तत्त्वज्ञान आकार घेते.  तुम्ही तुमच्या आयुष्यात काय विचार करणार आणि काय करणार हे तुमच्या कायीक निर्देशांकावर अवलंबून असते.  आता स्पष्ट झालेले आहे की, जागृत मेंदू ही माणसाच्या आयुष्यातील थोडीशी बाजू आहे.  प्रत्यक्षात आपल्या मेंदूचा मोठा हिस्सा अजून मनोकायिक रहस्यच आहे.  तो सांगतो की तुम्हाला माहीतच नाही की तुमची खरी क्षमता काय आहे कुठे आहे.  म्हणून आपले विश्लेषण आपणच करावे.  याचा आपण विचार करु शकत नाही परंतु याचे रहस्य आपल्या जणुकीय संरचनेत असतं.  व्यापक मानवीयता संस्कारातून तयार नाही करता येत.  ती बिजात तयार होऊनच येते.  सुधारणेसाठी थोड्याशा संस्कारांची किंवा जडणघडणीची संधी किंवा जागा असते.  या व्यतिरिक्त मूलभूत रचनेची बौद्धीकसंपदा महत्वाची ठरते.  तिच्यावर संकर सहज सोपा नाही.

आपण जगात एकच आहोत.  आपल्यासारखे आणखी कोणीही नाही.  आपण जे जग पाहतो ते आपल्या संवेदनांचे प्रतिबिंब आहे.  ते मी पाहतो म्हणून आहे.  निरीक्षक उपस्थित आहे म्हणून आहे.  तो नसता, त्याच्यासाठी अन्यथा ते नाही.  म्हणून माझे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे.  लोकतंत्र तेंव्हा साकार होते जेंव्हा माझे अधिकार काय आहेत याची जाणीव होते.  मग त्यासाठीचे कर्तव्य येते.  आधी कर्तव्य नाही तर आधी अधिकारांची जाणीव व्हायला हवी मग कर्तव्य बजावनी सुरु होते.     

आधी जग बदलण्याची भाषा करण्यापेक्षा आधी स्वतःला बदलण्याची गरज असते.  स्वतःमधे क्रांती घडवून आणण्यामधे विश्वास ठेवावा.  कारण आपले जीवन बदलले तर त्या पेक्षा मोठे बदल कोणतेही नाहीत.  देश, राज्य, गाव आणि आपले नाव यांच्या सीमारेषा सुरक्षीत नसतील तर आधी तिथे प्रयत्नपूर्वक भक्कम बदल घडून आणला पाहिजे.  जग बदलून गेले पण आपण तसेच राहिलो, जगाचे बदल समजले नाही किंवा आपल्याला बदलाचा आवाज ऐकू आलाच नाही तर जगावर सकारात्मक परिणामासाठी घाव घालणारांचे हेतु साध्य होत नाहीत.  या उलट संधीसाधू आपला डाव मात्र साधून जातात आणि सामाजिक बदलांच्या प्रक्रिया पुन्हा नको त्या जंजाळात अडकून पडतात.   

देशासाठी काही करण्याची भाषा करण्या आधी स्वतःसाठी काही करा, जे देशासाठी पूरक असेल.  ते तसे असले की आपण आपल्यासाठी नव्हे देशासाठीचे आपोआप कर्ते बनून जाते.  देश तुमच्या कार्यावर खुष होतो.  आपण आपल्यासाठीच काही करु शकत नाहीत आणि मोठमोठे मनोनरथ बनवतो, देशबदलाची भाषा करतो, म्हणजे पाय जमीनीवर नाहीत पण आभाळ पेलायचे आहे अशी स्थिती आहे.  क्षमते शिवाय कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही. 

तुमची वैयक्तीक धारणा हीच अंतीम आहे असा समज जोपर्यंत असतो तो पर्यंत दुसऱ्याचे ऐकूण घेण्याची, ऐकले तरी ते सत्य असूनही मानण्याची तयार नसते.  विचारांच्या संरचनेवर काम करण्याची तयारी असलेले राजकारणी तसे दुर्मीळच.  कारण विचारांचे परिमाण एक तर निश्चत नसते.  ते स्थळ, काळ, वेळ सापेक्ष असते.  म्हणून त्याचे परिणाम तातडीने मोजता येत नाहीत.  दूरदृष्टीने केलेल्या सकारात्मक कामांचे अनुकूल परिणाम उशीराने मिळणार असतात.  तातडीने आपापल्याच पिढ्यांची व्यवस्था करण्यात मश्गुल असलेल्या नेत्यांना हे नको असते.  मग ते निवडणूक कमी आणि आपली, आपल्या पिढनपिढ्यांसाठीची जुळवणूक अधिक करतात.  परिणामी हवे ते जुगाड करणे ओघानेच येते.  निवडणुका म्हणजे लोकलुभावन बोलण्याच्या कलेचा जलसा ठरु लागतात.

धरणे, सेतू, रस्ते, अदी तत्त्काळ व्यापक हिताची व दूरगामी उपयोगाची भौतीक साधने तयार करताना साधनांना समयबद्धतेऐवजी दीर्घकालीन कार्यक्रम बनविले जाते.  हे सर्वांना समजते परंतु समाजाचे व व्यवस्थेचे दिसून स्वार्थांधळेपण आडवे येते.  अशी साधने दिसतात, दाखविता येतात आणि त्यातून उलाढालही करता येते.  मग जगभरातील भौतिक सुविधांचे स्वप्न दाखविले जाते.  एकीकडे या आवकीचा तत्तकालीन लाभ आपल्याच आवाक्यात रहावा आणि दीर्घकालीन उपयोग आपल्याच पिढ्यांना व्हावा अशी व्यवस्था केली जाते.  तसेच अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी पूरक मानसिकतेचा समाज घडविला जात नाहीत.  तसा तो घडला नाही की मग कायद्याचा आधार घेतात.  त्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा नव्या अस्थापना आणि नवे कर्मचारी किंवा आहेत त्यांच्यावरच नवा बोजा पडतो. 

समाज जेवढा कायद्याने बांधण्याचा प्रयत्न केला जातो तेवढा  तो सुप्तपणे खुनशी होत जातो.  सुप्त मनात कायद्याची छेडछाड करण्याची खुमखुमी बाळगून राहतो.  असे होऊ नये यासाठी कायद्याची कठोर व समयबद्ध अंमलबजावणी गरजेची असते.  उशीराने न्याय आणि सोई-सवडीने अंमबजावणी होत असेल तर एकीकडे शिरजोर आणि दुसरीकडे दबलेली उदासीन पिढी वाढत जाते.  माणसं जेवढी नैतिकतेने बांधली जातील तेवढी ती मुक्त आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करतात.  मात्र बकालपणा बदलने एका रात्रीत शक्य नसले तरी भौतिक सुविधांवरील खर्चाबरोबर नैतिक बदलाच्या रास्त गुंतवणुक आणि कठोर अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.  अन्यथा आपल्याच आस्थापना आणि सुविधा पेटविणे आणि पाडणे अशा सूडबुद्धीत धन्यता मानणारे दुष्ट, विघ्नसंतोषी समाजमन वाढत जाते.  ते हाताशी धरले जाते.  प्रभावीरित्या बांधलेल्या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहात अस्वच्छता माजविणे आणि तिथल्या सुविधांची फोडतोड करणारे हे काही शत्रुराष्ट्रातून आलेले नसतात.  आपल्याच राष्ट्रातील समाजहीताचे शत्रू असतात. 

नष्ट होणाऱ्या बाबी पुन्हा पुन्हा बनवाव्या लागतातच.  पण आपल्या संस्कारांची पदचिन्हे कायम स्वरुपी सुचारु समाज बनवतात.  त्याचा इतिहास तयार होतो.  तो गौरवाने सांगीतला जातो आणि आमलात आणला जातो.  मात्र देखभाल आणि दुरुस्ती दोन्हीकडे वेळेत होणे आवश्यक असते.  आमलात आणावा असा इतिहास नसेल तर तो डावलण्याची मानसिकता देखील आपल्या संस्कारिक पदचिन्हांनी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी तयार केली पाहीजे.

अंगणात लावलेले आंब्याचे झाड पुढच्या पिढीला फळ देते पण पुढच्या पिढीला झाड संवर्धनाचा संस्कारच नसेल तर तो अंगणातील झाड तोडून टाकील आणि घरात 'बाजारू' आंबे आणील. इथे हा विचार आपल्या उत्पादन क्षमतेवर कुह्राड चालवितो आणि दुसर्याच्या उत्पादन क्षमतेवर अवंलबून राहतो. भौतिक सुविधांमागील हेतू निश्चित समाजोपयोगी असेल पण प्रगल्भता येण्यासाठी केवळ कायद्याची बंधणे वाढविणे हा उपाय नाही. एक तर ते असूनही कायद्यांची पळवाटायुक्तता आणि स्पष्टतेचा अभाव व अंमलबजावणीतील लीळबीळतपणा कायद्यांना पुस्तकात आणि पुस्तकांना देखाव्याच्या साधनात ठेवतो.  खरे तर ज्या समाजाला जास्त कायद्याची गरज भासते तो बकालांचा समाज असतो.

माणसे कालवश होऊन जातात परंतु उपयुक्त पुस्तके कालातीत असतात.  म्हणूनच आजही शेकडो-हजारो वर्षांपुर्वीची पुस्तके वाचनीय आहेत.  आजही मार्गदर्शन करताहेत आणि आजही ताजी व जीवंत आहेत  उद्याही ती तेवढीच संदर्भीत असतील.  परंतु पुस्तकांच्या विश्लेषणाची, समीक्षेची व काळानुरुप फेररचनेची क्षमता समाजात असणे ही असते विचारांची ताकद.  अशाही विचारांमधे विष कालविण्याचे काम करण्यासाठी दुष्ट हेतुच्या तथाकथित शक्तींनी हस्तक्षेप करत नकली पुस्तकांमधे आपल्या विषारी विचारांचे संदर्भ घालून ते बाजारत आणले तर मात्र वर्तमानापासूनच पिढ्यांच्या बुद्धीभेदाची पायाभरणी होते.  भाराभर मुले घरामधे असुद्या, ते सर्व आपापले आयुष्य जगून मरुन जातील.  परंतु त्यातील एखाद्याने त्रिकालाबाधीत सत्य सांगणारे पुस्तक लिहूद्या, त्या पुस्तकाचे आणि लेखकाचे आयुष्य कधीही संपणार नाही.  सामान्य माणसे नातवापर्यंत जीवंत असतात.  त्यापुढील पिढीला सामान्यांचे नाव माहीत नसते.  परंतु चांगले काम करणारे पिढ्यानपिढ्यासाठी जीवंत असतात.  त्यांचे जिवंतपण कालातीत असते, प्रत्येक युगात नवसमाज निर्मितीस पूरक असते.

ज्या देशाचे ‘दर्शन’ समायोजित, समयोचित व उत्तम असते त्याचे अर्थशास्त्रही उत्तम असते.  ‘दर्शनाची अधोगती देशाच्या ‘अर्थाचा अनर्थ करते. समाजात हेकेखोरांची संख्या वाढवते.  तुमचे ज्ञान वास्तविकता, सत्यता त्यांच्या अस्तित्त्वाचे उद्देश आणि कारणावर चर्चा करणारे असावे.  सत्याची चर्चा नाही झाली तर समस्यांची उकल होत नाही.  तसे नसेल तर ज्ञान व्यक्तीगत किंवा समाजविशेषाचे हीत जोपासणारे बनते जे अनागोंदीला जन्म देते.  अशा कथित ज्ञानाचा बोध झाला नाही तर अनागोंदीची पुनरावृत्ती होत राहते आणि त्यातून असा समाज बोध घेणेच विसरुन जातो.  मग व्यक्ती ते समष्टी पराभूत आणि गुन्हेगारी मानसिकतेची बनत जाते.  अशा मानसिकतेत अडकलेल्यांमधे सुधार करण्याची वृत्ती जन्म घेऊ शकत नाही आणि मग दुष्टचक्र कायम राहते.  ते भेदण्यासाठी  अवतार येईल अशा भ्रमात राहण्यापेक्षा आपला अवतार सुधारला तर अवतार येण्याची कल्पना करण्याची गरज राहणार नाही.  नेतृत्त्व आपण महान असल्याचा आभास निर्माण करु शकते.  परंतु आभास काही कालावधीसाठीच टिकतो.  जगाने याचा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी घेतला आहे.  कोणताही आभासी नेता आपले कथित महानत्त्व चिरकालासाठी सिद्ध करु शकत नाही.  वास्तवाच्या कसोटीवर जो स्वतःला सिद्ध करेल तो देशाचे महानत्त्व जगाला मानायला भाग पाडेल. 

आता व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असली तरी ती आमची आहे एवढ्या एका निकषावर ती गटाकडून पुरस्कृत केली जाते.  असे पुरस्कृतीकरण मग गटा-गाटांच्या आणि पुढे व्यापक समाजाच्या परस्पर तिरस्काराचे मूळ बनत राहते.  अशी वृत्ती प्रस्थापित झाली की तिला आळा घालताना व्यवस्थेची दमछाक होते.  कारण अशा गाटांचे तथाकथित बुद्धीजीव आणि सत्तालोलूप पाठिराखे एक होऊन व्यवस्थेला जेरीस आणतात आणि अव्यवस्था वाढतच राहते.  जेरीस आलेल्या व्यवस्थेला सावरण्याचे काम सत्तेचे घटक करतात तेंव्हा वर्तुळाबाहेरील धोका त्यांच्यापुढे उभा राहिलेला असतो.  असे धोके निर्माण करणारांची पिढी जिथे तयार होत राहते तिथे मोठे लहानांना दुष्टता व छळवणूक वारसा म्हणून देतात आणि भोगलेले धाकटे जेंव्हा थोरले होतात तेंव्हा तीच दुष्टता पुढे करत राहतात.  ही एक विचीत्र स्थिती असते आणि इथे संस्कार तोकडे पडू लागतात.  संस्कारांच्या नावाने नाक-डोळे मुरडणारांना ही बाब समजून घ्यावी लागेल अन्यथा दुष्टता हाच आपल्या संस्कारांचा समाजाचा सिद्धांत बनून जातो.

 जनतेसाठी सत्य नको असते.  त्यांना हवे असते त्यांच्या बाजूने बोलले जाणारे कृत्रीम सत्य.  कारण कटु सत्य बोलणे जीवावर बेतू शकते.  जनतेची सत्याची मागणीच नसते.  मागणी असते ते आभास विकण्याची.  पण हे तेंव्हा होते जेंव्हा जनतेला सतत आभासी जगाच्या नशेत ठेवले जाते आणि ते आभासी जगच सत्य वाटू लगते.  नशा उतरली तर सत्य खोटे वाटू लागते आणि पुन्हा पुन्हा नशेचीच गरज वाटू लागते.  कारण तोपर्यंत नशा नसानसांमधे भिनलेली असते.  रक्ताबरोबर या नशेचे चलनवलन शरीराला सवईचे झालेले असते.  त्यात बदल करण्याची ना मानसिक कुवत असते ना शारीरिक क्षमता किंवा तयारी.  ज्या जनतेला सत्याची तहाण लागते ती जनता आभासी जग दाखविणाऱ्या नेतृत्त्वाला डावलून मोठा बदल घडवून आणते.

 ज्यांना युद्ध हे भविष्य नसून स्पर्धा हेच भविष्य आहे हे समजले ते देश प्रगती करु लागले.  ज्यांना युद्धात भविष्य दिसत होते ते अडकून पडले.  ज्यांना सतत युद्धसदृश्य कुरघोड्या करण्यात भविष्य दिसत होते ते अशा पेचात सापडत गेले की पेच सोडवावा तर आणखी गुंता वाढत जातोय.  न सोडवावा तर गुंत्यात मान अडकत जातेय.  ज्यांनी युद्धाचे मैदान शस्त्रासांमधे शोधले ते रसातळाला गेले आणि ज्यांनी युद्धाचे मैदान व्यापारा मधे शोधले ते तर शस्त्रे विकून वेगाने प्रगती करत गेले.  ‘व्यापार युद्धात’ जीव जात नाही जीव जगविण्याची साधने शोधली जातात.  शस्त्रांच्या युद्धात जीव घेणे हाच मुख्य उद्देश्य असतो.  मग शस्त्र स्वतः हातात घेऊद्या किंवा आपल्यासाठी शस्त्र चालविणारा पुरस्कृत केला जाऊद्यात.  अशा वेळी जसे शस्त्राला स्वतःची अक्कल नसते तसेच पुरस्कृत केलेल्याला स्वतः डोके नसते, ते त्याने पुरस्कर्त्याकडे गहाण ठेवलेले असते आणि तो त्याच्या विचारांचे संचालन करत असतो.  पण याचा अर्थ असा नाही संचालकाला याचा त्रास होणार नसतो.  ते त्याला भोगावेच लागते.  आपल्या ‘घरातील किडुक-मिडूक विकून किंवा कर्ज घेऊन घेतलेले शस्त्र भाडोत्री हातात देऊन चालवावे लागल्याने आपल्या घराच्या अर्थव्यवस्थेचा अनर्थ तर होणारच की.  सतत शेजारी-पाजारी संघर्ष करण्याने तसे करणाऱ्याला स्थैर्य कसे लाभणार?  त्या ऐवजी व्यापारी संघर्ष केला तर किमान नुकसानीची भरपाई करण्याची दिशा तर मिळू शकते.  सुधारण्याची संधी तरी मिळू शकते.  परंतु समोरच्याच्या जीवावारच उठायचे ठरवले तर त्यासाठी मरण्या-मारण्याची साधन सामुग्री खरेदी करण्यावर बेसुमार खर्च होणार.  त्या सामुग्रीचा वापर करण्यावर खर्च होणार.  वापरा नंतरच्या परिणामांना तोंड देण्यावरही खर्च होणार.  परिणाम अदृश्य असतीलही परंतु तोंड देणे अदृश्य कसे होईल.  तिथे तर वस्तुस्थितीचा सामना आभासी पद्धतीने करता येणार नाही.  तसे काही काळ केले तर आलबेल असल्याचा फुगा कधीतरी फुटणारच की.  तुम्हाला एक तर ताकद असेल तर लढले पाहिजे मात्र त्यासाठी आधी तुमची ताकद वाढविली पाहिजे किंवा जिंकणाऱ्या बरोबर सहभागी झाले पाहिजे.  जे या दोन्ही गोष्टी करत नाहीत ते मधेच कुठे तरी अडकून पडतात आणि त्यांचाच फास त्यांच्याच (अ)व्यवस्थेच्या गळ्याला लागणे सुरु होते. 

आता नजिकच्या भविष्यात पैसा हाच सर्वात मोठा धर्म असेल आणि त्यामुळेच तुमचे धर्म वाचतील.  अर्थोरक्षितीधर्माः , पण पैशासाठी अधर्माचा वापर करुन लढलात तर धर्मही बुडेल आणि पैसाही संपेल. मग धर्मोरक्षितीरक्षितः याचे महत्तव पटेल. नवयुगात अर्थाशिवाय धर्माचे पालन शक्य कसे होईल.  सुज्ञांना यातून काय निवडायचे ते समजले पाहिजे.  अन्यथा ते सूज्ञ कसले.  इथे तुम्ही जेवढे सत्य सहन करु शकाल तीच तुमच्या सहनशीलतेची ताकद असते. 

पण सत्य सहन होणे अशक्य झाले की चुकीचे निर्णय घेण्याची मालिकाच सुरु होते जी आत्मघाताकडे घेऊन जाते.  कारण मेंदुला तुम्ही जे भरवणार त्याचा भार तुमच्यावर प्रभाव पडण्यापासून सुरू होणार.  प्रभाव जर नकारात्मक असेल तर मेंदुला काय भरवावे हे ठरविण्याचे भान हरपलेल्यांना वेडेच म्हणावे लागेल.  आता तर माहितीचे प्रचंड प्रसारण करणारे आणि कृत्रीम बुद्धीमत्तेचे युग आहे.  हे युग सत्याचा तपास सहजा सहजी लागू देत नाही आणि सत्य शोधणे सोडून देण्यास किंवा जे तथाकथित सत्य समोर आहे तेच स्वीकारण्यास मनोकायीकरित्या भाग पाडते.  महितीचा भडीमार सत्याचा आभास तयार करतो.  म्हणून असत्याला सत्य करण्यासाठी सातत्याने हवी तेवढीच माहिती थोपवली जाते, माथी मारली जाते.  मग जे समोर आले आहे तेच सत्य मानून चालण्याची गोबेल नीती आपणच आपल्या मेंदूवर कोरुन घेतो जी की आपल्या मेंदूत निर्माण होणाऱ्या अनागोंदीला व्यापक सामाजिक स्वरुप देऊन जाते.  या अनागोंदीत तुम्ही सत्य आणि तथ्य शोधण्याची उत्सुकताच हरवून जाता.  समोर आले तेच ग्राह्य धरु लागता.  मग तुम्ही सत्य सांगणारी पुस्तके जाळू लागाता आणि त्याचा आनंद घेत उन्मादी होत जाता.  तुम्ही हे असेच वागावे अशी अपेक्षा असणारी व्यवस्था तुम्हाला अशाप्रकारे कथितरित्या आनंदी करुन मारत राहीते.  या विकृत आनंदाच्या भरात येणारे मरण सार्थक असल्याचा आभास तुमच्या मेंदूमध्ये भरला जात राहील आणि असे मरण स्वीकारण्यास तुम्ही सतत तत्त्पर राहत जाल. 

ही मालीका कुठे खंडीत होईल किंवा त्याचे परिणाम काय असतील हे आज तरी स्पष्ट करणे शक्य नाही.  आता पुस्तके जाळण्याची गरजच पडत नाही कारण ती वाचण्यासाठी हातात घेतली जात नाहीत.  ती बहुतांशरित्या ठेवली तिथेच दफन झाली आहेत.  आता हातात असे यंत्र आहे जे तुम्ही काय वाचावे तेच तुमच्या पर्यंत पोचविते किंवा तुमची वैचारिक झींग कायम राखणारेतुम्हालाच सोईचे वाटणारे तेवढे ताबडोतब आणि सतत सहज उपलब्ध करुन देते.  त्या तथाकथित सत्याच्या आहारी जाऊन आपणच आपला मेंदू गहाण ठेऊन देतो आणि एकदा नशेची सवय जडल्यावर ती कधी उतरुच नये म्हणून नशेखोरांना जसा रोज सकाळी ‘उतारा’ मारावा लागतो तसे रोज सकाळी शौचकुपावर बसतानाही आपल्या हातात भ्रमण ध्वनी यंत्र असते.  जे आपल्या विचारांना आपल्याच विचारांनी कुंठीत करत असते.  या यंत्राचे असे शस्त्र केले गेले हे खरे आहे.  पण आपला विवेक शाबूत असेल तर याचा उपयोग आपल्या विनाशासाठी होऊ दिला जाणार नाही हे ही तितकेच सत्य आहे.  परंतु प्रश्न येतो तो अधीन व्हावे की अधीन ठेवावे याचा.  या प्रश्नाचे उत्तर अनेक समस्यांवर मात करणारे ठरु शकते.  यातच तुमच्या सर्व समस्यांचा उपाय दडलेला आहे. 

 

टिप्पण्या

  1. सर खूप अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. विशेष म्हणजे किती तरी विषयांना स्पर्श करणारा, चिंतन करायला लावणारा, व्यक्ती ,समाज, देश, विदेश, लोकशाही, झुंडशाही , इतिहास, आभासी जग, राजकारण आदी विषयांवर आजपर्यंत कोणीच लिहिले नाही. असे लिखाण केले आहे. हा लेख ज्या ज्या वेळेस नव्याने वाचला जाईल. वाचकाला तो नवं ज्ञान आणि भान देईल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस व राजकारणाच्या फडातील कोंबडीबाज बिबटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकसंख्या विषयक विचार.

माझी लीव्ह व्हॅकन्सी..